शासकीय गोदामातील रेशनच्या धान्याला फुटले पाय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 04:22 PM2021-10-18T16:22:31+5:302021-10-18T16:25:30+5:30
वर्ध्यातील विकासभवनामागे असलेल्या शासकीय धान्य गोदामातून वितरित करण्यात येणार धान्यसाठ्याच्या पोत्यात ४ ते ५ किलो धान्य कमी असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे गोदाम व्यवस्थापकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वर्धा : शासनाकडून गोरगरिबांसाठी स्वस्त दरात धान्य दिले जाते. मात्र, स्वस्त धान्य गोदामातून पुरवठा होणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांकडे जाणाऱ्या धान्यसाठ्याच्या कट्ट्यात चार ते पाच किलो धान्य कमी मिळत असल्याचा आरोप आता स्वस्त धान्य दुकानदारांकडून केला जात आहे. त्यामुळे शासकीय गोदामील रेशनच्या धान्याला पाय फुटले की काय, असा प्रश्न सहज उपस्थित होतो आहे.
वर्धा तालुक्यात एकूण १४४ स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र, वर्ध्यातील विकासभवनामागे असलेल्या शासकीय धान्य गोदामातून वितरित करण्यात येणार धान्यसाठ्याच्या पोत्यात चार ते पाच किलो धान्य कमी असल्याच्या तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे गोदाम व्यवस्थापकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची नितांत गरज असल्याची मागणी आता स्वस्त धान्य दुकानमालकांकडून केली जात आहे. याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांनी अनेकदा जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रारीही केल्या आहेत. त्यामुळे गरिबांच्या हक्काच्या धान्याचा काळ्या बाजारात विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत तत्काळ चौकशीचे आदेश देण्याची गरज निर्माण झाली आहे.
काळ्या बाजाराचा गोरखधंदा
शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाणारा गहू, तांदूळ आदी धान्यसाठ्यात कमालीची तफावत असल्याचे अनेक दुकानचालकांनी सांगितले. ५० किलोचे एक पोते दुकानात येत असून दुकानचालकाने ते पोते मोजले असता त्यात तीन ते चार किलो धान्यसाठा कमी राहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एका पोत्यात ३ ते ४ किलो कमी धान्य राहत असून अशा किती पोत्यांतील धान्य गोदामात साठवणूक करून ठेवल्या जाते, हा प्रश्न आहे. त्यामुळे या धान्याची काळ्या बाजारात विक्री तर होत नसेल ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी तहसीलदारांच्या कक्षात ई-पीक ॲपबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. बैठकीत एका स्वस्त धान्य दुकानचालकाने तहसीलदारांना गोदामातून धान्य कमी येत असल्याचे सांगितले. दरम्यान, तहसीलदारांनी थेट त्या दुकानचालकाच्या दुकानात जात पाहणी केली असता त्यांनाही ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ शासकीय गोदामात जात तपासणी केल्याची विश्वसनीय माहिती आहे. मात्र, पुढे काय झाले, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
पुलगावातही असेच प्रकरण...
काही महिन्यांपूर्वी पुलगाव येथे रेशनचा धान्यसाठा भरून असलेला ट्रक पुलगाव पोलिसांनी पकडला होता. यावेळी पोलिसांना तेथील शासकीय गोदाम चालकावर संशय आल्याने त्याची चौकशी झाली. मात्र, त्यानंतर त्या प्रकरणात नेमका काय तपास झाला, हे गुलदस्त्यात आहे. वर्धा तालुक्यातही असाच प्रकार पुढे आला असून याची चौकशी करण्याची गरज आहे.