गावातील निराधार वृद्ध स्त्री-पुरूषांना मोफत जेवणाचे डबे; वर्ध्यात १३ वर्षांपासून वार्धक्याला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 09:42 AM2017-12-21T09:42:25+5:302017-12-21T09:42:56+5:30
उत्कर्ष ग्रामविकास संस्थेने ‘अन्नछत्र’ उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाची तपपूर्ती झाली असून दररोज न चुकता या वृद्धांना जेवणाचा डबा पोहोचविण्याचे अविरत कार्य केले जात आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : वार्धक्यात शरीर थकायला लागते. मनु्ष्य परावलंबी होतो. सांभाळ करायला कुणी नसलेल्या वृद्ध जीवांची फरफट होते. कुटुंब, समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या निराधार वृद्धांना अखरेचा काळ सुसह्य व्हावा म्हणून उत्कर्ष ग्रामविकास संस्थेने ‘अन्नछत्र’ उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाची तपपूर्ती झाली असून दररोज न चुकता या वृद्धांना जेवणाचा डबा पोहोचविण्याचे अविरत कार्य केले जात आहे. हे पूण्यकर्म शासनाकडून मात्र अद्याप दुर्लक्षित असल्याचेच दिसते.
उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष संजय गांडोळे व सहकाऱ्यांनी या सामाजिक समस्येवर आपण काम करायला पाहिजे, असे ठरविले. वृद्धापकाळात आप्तस्वकियांच्या आधारापासून वंचित झालेल्या, काळाच्या ओघात एकाकी पडलेल्या वृद्धांना मायेची वागणूक व अन्न पुरविण्याचा उपक्रम सुरू झाला. मागील १३ वर्षांपासून हा उपक्रम अविरत सुरू आहे. गावातील दहा निराधार वृद्ध महिला-पुरूषांना दररोज डबा पोहोचविण्याचा दिनक्रम झाला आहे. या वृद्धांपैकी एका वृद्ध व्यक्तीला मृत्यू झाला. यामुळे आणखी एका गरजू वृद्धाला या उपक्रमात सहभागी करून घेत अन्नदानाचे हे कार्य संस्थेने सुरूच ठेवले आहे. हे सेवाकार्य अव्याहात सुरू ठेवण्याकरिता संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व काही दानदाते सहकार्य करतात. पाऊस, वादळवारा, असो वा कडाक्याची थंडी कधीही वृद्धांना भोजनाचा डबा पोहोचविण्यात खंड पडत नाही. या आपुलकीच्या छत्राने वृद्धांचे दु:ख, एकाकीपणाला आधार दिला आहे. या वृद्धांना घरी शिजविलेले अन्नच दिले जाते. सण उत्सवात गोडधोड करून वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न केला जातो. वृद्धांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे. संस्था या वृद्धांच्या वार्षिक भोजनासाठी एक लाखावर रकमेची तरतूद करते. महागाईनुसार भोजन खर्चाच्या रकमेत वाढ होत आहे. हे महत्कार्य अनेकांच्या एकत्रित प्रयत्नातून होत आहे, हे विशेष!
संस्था उपाध्यक्ष डॉ. वंदना वैद्य, कोषाध्यक्ष विक्रांत जिंदे, संजय ठाकरे, राजू डगवार, अजय गांडोळे, सुरेश मुडे, शालू काळे यांचे अध्यक्ष संजय गांडोळे यांना सहकार्य लाभते. काही दानदाते या सेवाकार्याला मदत करतात, असे गांडोळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. समाजाला दिशा, वृद्धांना सन्मान व आधार देणाऱ्या संस्थेच्या सेवाकार्याची शासनाने कधीच दखल घेतली नाही. कधी कुण्या अधिकाऱ्याने येऊनही पाहिले नाही!
गरजू, पालकांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांनाही दिला मदतीचा हात
गरजू, पालकांचे छत्र हरविलेल्या मुला-मुलींचा शैक्षणिक खर्च उचलण्याचे कामही उत्कर्ष संस्था करीत आहे. सध्या गावातील अकरा विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक खर्च या संस्थेतर्फे केला जात आहे. हे विद्यार्थी परिस्थितीसमोर हतबल होऊन शिक्षण सोडू नये, किमान दहावीपर्यंत तरी शिकावे यासाठी उत्कर्ष संस्थेकडून २००७ पासून विद्यार्थी दत्तक योजना राबविली जात आहे. शालेय साहित्य, गणवेश, शिक्षणाच्या इतर खर्चाची तरतूद संस्था करीत असल्याने या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निराधार वृद्ध व्यक्तींच्या सेवेतून मिळणारे समाधान मोठे आहे. आमच्या संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांना हे सेवाकार्य आपल्या हातून घडत असल्याचा आनंद आहे. सुरूवातीला पाच वृद्धांच्या भोजनाची सोय आम्ही केली. १३ वर्षांच्या वाटचालीत आम्ही पवनार गावातील दहा निराधार वृद्ध व्यक्तींना अन्नछत्र देऊ शकलो असून विद्यार्थ्यांनाही आधार दिला आहे.
- संजय गांडोळे, अध्यक्ष, उत्कर्ष ग्रामविकास संस्था, पवनार.
घरचा माणूस १५ वर्षांपूर्वी मृत पावला. मुलबाळ काहीच नाही. शरीर थकेपर्यंत मिळते ते काम केले. आता म्हातारपणाने शक्य होत नाही. या अखेरच्या काळात उत्कर्ष संस्था आमची मायबाप आहे. या संस्थेने कुटुंबातील ज्येष्ठासम धीर दिला.
- लक्ष्मीबाई सरोदे, वृद्ध महिला.