शेतकरी व पशुपालकांसाठी मोफत कार्यशाळा

By admin | Published: May 28, 2017 12:31 AM2017-05-28T00:31:07+5:302017-05-28T00:31:07+5:30

गौतीर्थचे शैलेश अग्रवाल यांच्यावतीने १ ते २५ मे या कालावधीत शेतकऱ्यांकरिता विशेष मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली.

Free workshops for farmers and livestockers | शेतकरी व पशुपालकांसाठी मोफत कार्यशाळा

शेतकरी व पशुपालकांसाठी मोफत कार्यशाळा

Next

चारा पिकांचे बेणे, थोम्बे व बियाण्यांचे मोफत वाटप : गौतीर्थ आर्वी येथील उपक्रम, शेतकऱ्यांना मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गौतीर्थचे शैलेश अग्रवाल यांच्यावतीने १ ते २५ मे या कालावधीत शेतकऱ्यांकरिता विशेष मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली. आर्वी, आष्टी, कारंजा, वरूड व मोर्शी येथील या शिबिरांत ४ हजार ३७२ पशुपालकांना गौतीर्थ येथील चाराबागेत डॉ. सानप व सहकाऱ्यांद्वारे उत्पादित चारा पिकांचे बेणे, थोम्बे व बियाण्यांचे मोफत वाटप केले. यावेळी पं.स. गटविकास अधिकारी मरबड आष्टी, पवार आर्वी तसेच रोहणा, आष्टी, कारंजा, अमरावती, पुणे व मुंबई येथील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
पशुपालकाचे फायदे व त्यातून मिळणारा नफा शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून अग्रवाल यांनी गौतीर्थ या प्रकल्पाची स्थापना केली. तेथे संपूर्ण महाराष्ट्र, कोंकण व गोवा येथील शेतकरी व पशुपालक भेटी देत आहे. प्रकल्पाला भेट देणाऱ्या शेतकरी, पशुपालकांसाठी नियमित लघु कार्यशाळांचे आयोजन केले जाते. आगंतुकांना अग्रवाल यांच्याकडून सेंद्रीय शेती, पशुपालन अर्थशास्त्राची माहिती दिली जाते. शासकीय यंत्रणेतील अधिकारीही या कार्यशाळांत शेतकरी, पशुपालकांना मार्गदर्शन करतात. आर्वीच्या बीडीओ पवार शेती, पशुसंवर्धन, शैक्षणिक, महिला व शेतकरी सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीतील समस्या व उपाययोजना यावर मार्गदर्शन करीत आहे. पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सचिन सानप, सहकारी डॉ. दिवाकर काळे, डॉ. प्रशांत कदम कार्यशाळांत डेयरी फार्मिंग, पशुपालन यांचे फायदे, पशू आरोग्य व दैनंदिन पशू व्यवस्थापन आदींवर मार्गदर्शन करतात. शिवाय अनेक कृषी तज्ज्ञांनी कार्यशाळांत मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीवर भर देणे काळाची गरज आहे. निसर्गात सर्व सजीवसृष्टी जगण्याची एक साखळी आहे. समृद्ध पोषणातून ही अन्नसाखळी जपली जाते; पण अधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात ही साखळीच नष्ट झाली. माती हे पिकांना पोषणतत्व पुरविण्याचे माध्यम आहे. रासायनिक खताच्या अतिरेकी वापराने मातीतील हे पोषणत्वच कमी होत आहे. रोग, किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी निसर्गात मित्र व शत्रुकिडी उपलब्ध आहे; पण त्याचा शास्त्रशुद्ध वापर न केल्याने ही साखळी उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांचे परावलंबित्व कमी करण्यासाठी धोरण निश्चित केले पाहिजे. सेंद्रीय शेती व पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्याची व्यवस्था अग्रवाल यांच्या गौतीर्थ प्रकल्पस्थळी केली आहे. जीवामृत, गांडूळ खत निर्मिती आदी शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध साधन सामुग्रीचा कसा वापर करावा, याचे ज्ञान नव्याने सांगण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतपिकांच्या वाढ व उत्पन्नाचे प्रात्यक्षिक दाखविण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे.
गौतीर्थ प्रकल्पात गीर, गवळाऊ, साहिवाल, हरियाणा, थारपारकर, राठी, होलस्टन, फ्रइसेन, आफ्रिकन फ्रइसेन व आईर्षाइर आदी प्रजातीच्या गायी आहे. हिरव्या वैरण बागेत मका, बरसीम, मेथी, शेवरी, नेपियर, बाजरी, मकचारी, ज्वारी, लसूणघास, पॅरागवत, ओट, चवळी, दीनानाथ गवत, गिनी गवत, न्यूट्रिफिड आदी हिरवा चारा तर सुबाभूळ, गिरीपुष्प व इतर झाडचारा आहे. औद्योगिक दृष्टीकोणातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीचे अग्रवाल यांच्या प्रयत्नाचे बीडीओ मरबड व उपस्थितांनी कौतुक केले.

Web Title: Free workshops for farmers and livestockers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.