स्वातंत्र्य हे साध्य नव्हे तर भविष्याच्या उभारणीचे साधन होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 06:00 AM2019-11-21T06:00:00+5:302019-11-21T06:00:17+5:30
स्वांतत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते तर ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते, असे मौलिक विचार ‘जवाहरलाल नेहरु: स्वांतत्र्य लढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान’ या पुस्तकात सामावलेले आहे. या पुस्तकाचे लेखन लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले असून ते पुस्तक आज सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांच्या चरणी अर्पण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : जवाहरलाल नेहरु यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्या आधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयांचा होता. स्वांतत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते तर ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते, असे मौलिक विचार ‘जवाहरलाल नेहरु: स्वांतत्र्य लढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान’ या पुस्तकात सामावलेले आहे. या पुस्तकाचे लेखन लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले असून ते पुस्तक आज सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांच्या चरणी अर्पण करण्यात आले.
सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमातील बापू कुटीला संपादक सुरेश द्वादशीवार यांनी भेट दिली. त्यांनी ‘जवाहरलाल नेहरु: स्वांतत्र्य लढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान’ हे पुस्तक बापू कुटीतील बापुंच्या गादीवर ठेऊन ते नतमस्तक झाले. यावेळी चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा मनपा नगरसेवक नंदू नागरकर, सेवाग्राम आश्रम कार्यालयाचे प्रमुख सिद्धेश्वर उंबरकर, आनंद निकेतन विद्यालयाच्या संचालिका सुषमा शर्मा व अतुल शर्मा यांची उपस्थिती होती. द्वादशीवार यांनी आश्रम परिसराची पाहणी करुन पुस्तक विक्री केंद्रालाही भेट दिली. त्यांच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिवंगत पतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या आयुष्याच्या प्रवासाचे ओझरते वर्णन करताना त्यांनी २७ वर्षे स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकित गेली. त्यापैकी १० वर्षे तुरूंगात काढली होती. डिसेंबर १९२१ मध्ये ते प्रथम तुरूंगात गेले.
त्यांचा अखेरचा तुरुंगवास ९ आॅगस्ट १९४२ रोजी सुरू झाला होता. तो १ हजार ४१ दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि १६ वर्षे त्या पदावर राहिले.त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रिय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र आहे, असेही या पुस्तकात नमुद आहे.