क्षुल्लक कारणावरून मित्रानेच केला घात
By admin | Published: October 28, 2015 02:20 AM2015-10-28T02:20:02+5:302015-10-28T02:20:02+5:30
येथील शासकीय धान्य गोदामाच्या मागील बाजूस चार दिवसांपूर्वी आढळलेल्या सुरेश मोहड याच्या हत्येमागील रहस्याचा उलगडा मंगळवारी सकाळी झाला.
‘त्या’ हत्येचा उलगडा : दगडाने ठेचून मारल्याची कबुली
आर्वी : येथील शासकीय धान्य गोदामाच्या मागील बाजूस चार दिवसांपूर्वी आढळलेल्या सुरेश मोहड याच्या हत्येमागील रहस्याचा उलगडा मंगळवारी सकाळी झाला. त्याची हत्या त्याच्याच मित्राने क्षुल्लक कारणातून केल्याचे समोर आले. या प्रकरणी आर्वीच्या हमालपुरा येथील संतोष ऊर्फ बाबू रामचंदन ठाकूर (२६) याला अटक करण्यात आली. त्याने हत्येची कबुली दिली असून सुरेशला दगडाने ठेचून मारल्याचे सांगितले.
सुरेश दारूच्या नशेत पडून दिसल्याने संतोषने त्याला घरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघात वाद झाल्याने संतोष याने त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आर्वी पोलिसांनी संतोष ठाकूर याच्यावर भादंविच्या कलम ३०२ अन्वये मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करीत दुपारी न्यायालयात हजर केले. आर्वी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
पोलीस सूत्रानुसार, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शासकीय धान्य गोदामाच्या मागच्या बाजूस सुरेश मोहोड याचा अर्धनग्न असलेला अर्धजळालेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकारामुळे परिसरात चांगलीच दहशत पसरली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांचा विविध दिशेने तपास सुरू होता. दरम्यान घटनेच्या दिवशीपासून हमालपुरा येथील संतोष टाकूर हा बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांच्या त्याच्या कुटुंबीयांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता तो नागपूर येथे असल्याचे समोर आले. यामाहितीवरून पोलिसांनी त्याला सोमवारी ताब्यात घेत विचारणा केली असता त्याने हत्येची कबुली दिली. मंगळवारी त्याच्या विरूद्ध आर्वी पोलिसांनी मनुष्यवधाचा कलम ३०२, २०१ भादंविनुसार गुन्हाची नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)