पाण्याकरिता नगराध्यक्षाच्या घरावर मोर्चा; शहरात तणाव
By admin | Published: May 29, 2017 01:07 AM2017-05-29T01:07:30+5:302017-05-29T01:07:30+5:30
मुबलक पाणी असताना या गावात नगरपरिषदेच्या नियोजन शुन्यतेमुळे पाण्याकरिता नागरिकांची भटकंती होत आहे.
नियोजन शून्यतेचा फटका : मुबलक पाणी तरीही पाणीटंचाई
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : मुबलक पाणी असताना या गावात नगरपरिषदेच्या नियोजन शुन्यतेमुळे पाण्याकरिता नागरिकांची भटकंती होत आहे. भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागल्यामुळे संतापलेल्या महिलांसह नगरसेविका सुमन पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक १ मधील १०० ते १५० नागरिकांनी शनिवारी रात्री नगराध्यक्ष संगिता शेंडे यांच्या घरासमोर ठिय्या केला. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सविस्तर वृत्त असे की, सिंदी येथील पाणी पुरवठा ११ किमी अंतरावरील वाकसूर नदीवरुन केला जात आहे. वाकसूर डोहात मुबलक पाणी उपलब्ध आहे. शिवाय गावात ६ लक्ष लिटरची क्षमता असलेली पाण्याची टाकी आहे. येथून शहरातील २,४०० नागरिकांना पाणी सोडले जात आहे. असे असताना स्टेशन व नदी पलीकडील नागरिकांना नगरपरिषद पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजन शुन्यतेमुळे पाण्याकरिता भटकावे लागत आहे. या बाबतीत अनेकदा लेखी तक्रार करूनही यावर मार्ग काढला नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी शनिवारी रात्री १० वाजता नगराध्यक्ष संगिता शेंडे यांच्या घरासमोर ठिय्या मांडला.
यावेळी नगराध्यक्ष बाहेरगावी गेल्याचे समजले. रात्री ११ वाजता नगराध्यक्ष व त्याचे पती सुनील शेंडे तसेच उपाध्यक्ष वंदना डकरे व त्याचे पती दिलीप डकरे नगराध्यक्षांच्या घरी आले. यावेळी उपस्थित मोर्चातील महिला नगराध्यक्षांशी आमच्या भागात नियमित पाणी देण्यात यावे अशी चर्चा करीत असताना उडालेल्या शाब्दिक चकमकीत सुनील शेंडे व दिलीप डकरे यांनी मोर्चातील महिला व पुरुषांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताळण्याकरिता पोलिसाना पाचारण करावे लागले. या प्रकरणात पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळल्याने आंदोलनाची सांगता करण्यात आली.
केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने सिंदी शहराचा विकास होईल व उन्हाळ्यात भेडसवणारी पाण्याची समस्या कायमस्वरुपी निकालात निघेल याकरिता सिंदी शहरवासीयांनी नगर परिषदेत भाजपाची सत्ता दिली; पण स्थानिक भाजपात आपसी ऐक्य नसल्याने शहराला त्याचा फटका बसत विकास कामांना खिळ बसल्याचा आरोप आहे.