जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर वृद्धेला भोवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:08 PM2019-01-21T22:08:37+5:302019-01-21T22:09:06+5:30
स्वातंत्र्य सैनिकाची कन्या तसेच वर्ध्याची चंडिका अशी ओळख असलेल्या सुलभा पिंगळे (७५) या काही कामानिमित्त जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर उभ्या असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. दरम्यान त्यांना भोवळ येत त्या जमिनीवर पडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वातंत्र्य सैनिकाची कन्या तसेच वर्ध्याची चंडिका अशी ओळख असलेल्या सुलभा पिंगळे (७५) या काही कामानिमित्त जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर उभ्या असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. दरम्यान त्यांना भोवळ येत त्या जमिनीवर पडल्या. हा प्रकार लक्षात येताच त्यांना परिसरातील नागरिकांच्या मदतीने तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक इंगोले चौक भागातील रहिवासी असलेल्या सुलभा पिंगळे या त्यांच्या काही खासगी कामासाठी मागील काही महिन्यांपासून जिल्हाकचेरीत उंबरठे झिजवत आहेत. सदर समस्या निकाली निधावी या हेतूने त्या आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. जिल्हाधिकारी काही कामात व्यस्त असल्याचे चपराशाने सांगितल्यानंतर त्या जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर प्रतीक्षा करीत होत्या.
दरम्यान त्या अचानक भोवळ येऊन जमिनीवर पडल्या. वयोवृद्ध महिला पडल्याचे लक्षात येताच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांनी घटनास्थळाकडे धावत घेत तिला उचलून बाजूला बसविले. याच वेळी बैठकीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असल्याने व त्यांना सदर घटनेची माहिती मिळाल्याने त्यांना तात्काळ सदर महिलेची तपासणी केली. शिवाय तातडीने रुग्णवाहिका बोलावून या महिलेला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
काही वेळानंतर सुलभा पिंगळे असे त्या वृद्ध महिलेचे नाव असल्याचे पुढे आले. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांची तारांबळ उडाली होती. सुलभा पिंगळे यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. प्रकृती बिघडली महिला ही माजी सैनिकाची धाडसी कन्या आहे, हे विशेष.
जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता हंटरचा प्रसाद
वर्धेचे तत्कालीन जिल्हाधिकारी जयरथ यांना याच सुलभा पिंगळे यांनी सन १९९० मध्ये हंटरचा प्रसाद दिला होता. इतकेच नव्हे तर त्यावेळी मुख्यमंत्र्यांकडून सुलभा पिंगळे या वेडसर असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर तत्कालीन विरोधी पक्ष नेते मनोहर जोशी यांनी सुलभा पिंगळे या वेडसर नसून त्या धाडसी असल्याचे म्हटले होते, हे विशेष.
जिल्हाधिकारी कार्यालयात भोवळ येऊन पडलेल्या सुलभा पिंगळे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात १२.४५ वाजताच्या सुमारास दाखल करण्यात आले आहे. तपासणीदरम्यान त्यांचे बी.पी. १४०-८० तर रॅन्डम शुगर १५० असल्याचे दिसून आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
- डॉ. अनुपम हिवलेकर, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा.