हिंगणघाट शहरात घटनेच्या निषेधार्थ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:18 PM2018-01-02T23:18:54+5:302018-01-02T23:19:08+5:30
कोरेगाव भीमा येथील घटनेचे पडसाद हिंगणघाट येथेही उमटले. भीम सैनिकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संतप्त युवकांनी हिंगणघाट शहरातून मोर्चा काढला. यावेळी निषेध नोंदविण्यासाठी महामार्गावर टायर जाळण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : कोरेगाव भीमा येथील घटनेचे पडसाद हिंगणघाट येथेही उमटले. भीम सैनिकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संतप्त युवकांनी हिंगणघाट शहरातून मोर्चा काढला. यावेळी निषेध नोंदविण्यासाठी महामार्गावर टायर जाळण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व बाळा मानकर, विजय तामगाडगे, मयुर सुखदेवे, विशाल सुखदेवे, विशाल थुल, अनिल मुन यांनी केले. मृतकाच्या कुटूंबियांना २५ लाखांची शासकीय मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांना निवेदन दिले.
खरा सूत्रधार शोधा - आयटक
पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा येथील शौर्यदिन कार्यक्रमात काही समाजकंटकांनी जमलेल्या लोकांवर हल्ला केला. गाड्यांची जाळपोळ केली. व दोन समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमागचा खरा सुत्रधार शोधून त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी आयटकच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना गजेंद्र सुरकार, दिलीप उटाणे, गणवंत डकरे, विनोद तेलतुबंडे, वंदना रामटेके, प्रज्ञा ढाले, शारदा धोबे, मंगला भगत, सुनीता वडे, कल्पना कांबळे आदींसह शेकडो महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या घटनेचा आयटकने निषेध केला असून हल्लेखोर व पोलीस अधिकाºयांवरही कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पुलगाव, नाचणगाव व गुंजखेडा बंदचे आवाहन
पुलगाव - कोरेगाव भीमा येथे घडलेल्या प्रकाराच्या निषेधार्थ बुधवार ३ जानेवारीला पुलगाव, नाचणगाव, गुंजखेडा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय निषेध मोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे. पुलगाव येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणातून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक कुंदन जांभुळकर व प्रकाश टेंभुर्णे यांनी केले आहे.