फळ व भाजीपाला व्यापारी पालिकेच्या विरोधात रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:49 PM2018-01-22T22:49:33+5:302018-01-22T22:49:56+5:30
येथील आठवडी बाजार सौदर्यीकरणाच्या नावावर फळ व भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने काढण्यात येणार आहे.
आॅनलाईन लोकमत
आर्वी : येथील आठवडी बाजार सौदर्यीकरणाच्या नावावर फळ व भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने काढण्यात येणार आहे. यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार असल्याने या विरुद्ध व्यापाऱ्यांनी सोमवारपासून बाजारपेठ बंद ठेवली. याचे निवेदन त्यांनी आमदार अमर काळे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिले आहे.
फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी अचानक पुकारलेल्या या बंदमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. भाजीपाला आणण्याकरिता १२ किमी अंतरावरील तळेगाव (श्या.पं) येथे जावे लागत आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या एक कोटी रुपयांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून येथील या आठवडी बाजारात ओटे, पार्किंग झोन व सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या कामाला शासनाच्या परवानगीनुसार सुरूवातही करण्यात आली आहे. आठवडी बाजाराकरिता आरक्षित जागेवर नगर परिषदेने पार्किंग झोन उभारल्यास या विक्रेत्यांना दुकान लाण्याकरिता जागा राहणार नाही. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचा आरोप या विक्रेत्यांकडून करण्यात आला आहे. यामुळे पालिकेने सौंदर्यीकरण करताना आठवडी बाजाराकरिता आरक्षित जागेवर सिमेंटीकरण करून भूमिगत नाल्या निर्माण कराव्यात व पार्किंग झोन दुसरीकडे उभारावे, अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. तत्पूर्वी या व्यापाºयांनी मार्ग काढण्याकरिता आ. अमर काळे यांना साकडे घातले. निवेदन देताना भाजी व फळविक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.