फळ प्रक्रिया शीतगृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: May 14, 2016 01:58 AM2016-05-14T01:58:58+5:302016-05-14T01:58:58+5:30
महाराष्ट्र राज्य कापूस पणन महामंडळाने तीन कोटी रुपये खर्चून शेतकऱ्यांच्या फळ, भाजीपाला या उत्पादनावर...
वीज व पाण्याची समस्या : तीन कोटी खर्चून केले बांधकाम
पुलगाव : महाराष्ट्र राज्य कापूस पणन महामंडळाने तीन कोटी रुपये खर्चून शेतकऱ्यांच्या फळ, भाजीपाला या उत्पादनावर प्रक्रिया करण्याकरिता येथील बाभुळगाव (बोबडे) मार्गावर शीतगृहाचे काम पूर्णत्त्वास आले. याकरिता तीन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र येथे पाणी आणि विजेची समस्या असल्याने त्याचे अद्यापही उद्घाटन झाले नाही. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या शीतगृहाचा कुठलाही लाभ शेतकऱ्यांना होत नाही.
पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचधारा मार्गावर ३.४० हेक्टर आर. जमीन आहे. त्यापैकी एक एकर जागा या शीतगृहासाठी पणन महामंडळाला सोपविण्यात आली. या प्रकल्पाचे काम तीन वर्षांत पूर्ण झाले असून या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याचे तर विद्युत व्यवस्था पुरेशी नसल्यामुळे ते निरुपयोगी ठरत आहे. पणन महामंडळाने य प्रकल्पाचे काम लोकप्रतिनिधीच्या आग्रहास्तव पूर्ण केल्याचेही बोलले जात आहे.
या प्रकल्पासाठी अनेक प्रश्न व समस्या निर्माण होणार आहे. पुलगाव शहर व ग्रामीण परिसरातील बागायतदार व शेतकऱ्यांचे फळ भाज्यांचे उत्पादन बाजार समितीकडे दलाली आणि विक्रीसाठी येत नसून परस्पर बाजारात विकल्या जाते. या प्रकल्पात विशिष्ट तापमानावर शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेली संत्री, पपई, केळी, आंबे ही फळे आणि भाजीपाला यांचा ताजेपणा टिकवून हंगामाविना सुद्धा कोणत्याही वेळी फळे व भाजीपाला उपलब्ध होवून शकणार आहे; परंतु शेतकऱ्यांचा फळभाजीपाला बाजार समितीला विक्रीला येतच नाही तर हा प्रकल्प कशासाठी हा प्रश्न परिसरात चर्चीला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)