वैरण उत्पादनाकरिता ४७ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 05:00 AM2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:00:02+5:30
योजनेअंतर्गत गतवर्षी प्राप्त २० लाखांच्या निधीतून १ हजार ३३३ लाभार्थ्यांना वैरण बियाणे व ठोंबे वितरण करण्यात आले. मागीलवर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे चाराटंचाईची परिस्थिती होती. त्या अनुषंगाने तत्कालीन कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मुकेश भिसे यांच्या उपस्थितीत आठही तालुक्यांचा आढावा घेण्यात आला. संभाव्य चाराटंचाईवर मात करण्याकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत कार्यवाही करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील वैरण उत्पादनामधील कमतरता भरून काढणे, पशुपालकांकडे असलेल्या पशुधनाची उत्पादकता वाढविणे आणि पशुधनाला पुरेसे हिरवे वैरण उपलब्ध करणे अर्थात शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उपलब्ध होण्याकरिता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दुभत्या जनावरांना वैरण उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून पालकमंत्री सुनील केदार यांनी ४७ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.
या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रतिएकर १५०० रुपयांच्या मर्यादेमध्ये वैरणीच्या विविध प्रजातींच्या बी-बियाण्यांचा आणि ठोंब्यांचा १०० टक्के अनुदानावर पुरवठा पशुपालकांना केला जाणार आहे.
योजनेअंतर्गत गतवर्षी प्राप्त २० लाखांच्या निधीतून १ हजार ३३३ लाभार्थ्यांना वैरण बियाणे व ठोंबे वितरण करण्यात आले. मागीलवर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे चाराटंचाईची परिस्थिती होती. त्या अनुषंगाने तत्कालीन कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मुकेश भिसे यांच्या उपस्थितीत आठही तालुक्यांचा आढावा घेण्यात आला. संभाव्य चाराटंचाईवर मात करण्याकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत कार्यवाही करण्यात आली.
त्यानुसार २०१९-२० च्या उन्हाळ्यामध्ये चाराटंचाई निर्माण न होण्याकरिता वैरण पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुपालकांकडून बियाणे, ठोंबे यांची वास्तविक मागणी नोंदविण्यात आली. त्यानुसार साधारणत: ३ हजार ४५१ पशुपालकांनी विविध पशुवैद्यकीय दवाखान्यांकडे नोंदविलेल्या मागणीनुसार ५३ लाखांची गरज होती. २०१९-२० मध्ये या योजनेकरिता २० लाखांचा निधी मंजूर होता.
आवश्यक अतिरिक्त ३३ लाखांच्या निधीची मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती माधव चंदनखेडे आणि जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष नितीन मडावी, कृषी व पशुसंवर्धन समितीचे तत्कालीन सभापती मुकेश भिसे यांनी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि क्रीडा व युवक कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्याकडे केली. त्यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत अतिरिक्त ३३ लाखांचा निधी मंजूर करून दिला.
पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत वितरण
मका ४५ हजार ६३६ किलोग्रॅम, ज्वारी २४ हजार ८१६ किलोग्रॅम, न्युटीफीड १ हजार २३४ किलोग्रॅम, ठोंबे ३ लाख ७५ हजार ५०० नग खरेदी करून वैरण बियाण्यांचे वाटप पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त डॉ. राजेश भोजने, डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे, डॉ. बी. व्ही. वंजारी यांनी केले आहे.
अशी आहे तरतूद
वैरण बियाणे खरेदीकरिता एकूण ४३ लाख ७८ हजार ३१६ आणि ठोंबे खरेदीकरिता ३ लाख ७५ हजार ५०० अशी एकूण ४७ लाख ५३ हजार ८१६ तरतूद खर्ची घातली जाणार आहे.
योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करीत वैरण बियाणे आणि ठोंबे उपलब्ध करून घ्यावेत. यातून चाराटंचाईवर मात करता येणार आहे.
-माधव चंदनखेडे, सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती, जि. प. वर्धा.