मंजूर बांधकामात निधीची आडकाठी
By admin | Published: February 28, 2015 12:19 AM2015-02-28T00:19:51+5:302015-02-28T00:19:51+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्तीसाठी एक गाव एक शौचालय योजना राबविली जात आहे़ यात शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे़ ...
वर्धा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्तीसाठी एक गाव एक शौचालय योजना राबविली जात आहे़ यात शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे़ वायगाव (नि़) येथील लाभार्थ्यांनाही शौचालय बांधकामाचे अनुदान मंजूर करण्यात आले; पण ग्रा़पं़ प्रशासनाद्वारे यातील निधीसाठी आडकाठी आणली जात आहे़ यामुळे लाभार्थ्यांना अनुदान मिळेणासे झाले आहे़ संबंधितांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी माणगी होत आहे़
वायगाव ग्रा़पं़ ने गावातील शौचालय नसलेल्या ग्रामस्थांची यादी तयार केली़ शौचालय बांधकामासाठी त्या यादीला मंजुरी देण्यात आली़ यात संबंधित शौचालयांसाठी लाभार्थी शुल्कही घेण्यात आले़ काही लाभार्थ्यांनी स्वत: शौचालय बांधकामास प्रारंभ केला तर काहींनी कंत्राटदाराची नियुक्ती केली. प्रेमिला पोटफोडे यांनी स्वत: बांधकाम करण्यास नकार दिल्याचे सांगितले़ ग्रामस्थांनी स्वत: बांधकाम केले असताना ग्रामपंचायत प्रशासन निधी देण्यात आडकाठी टाकत असल्याचे ग्रामस्थांद्वारे सांगितले जात आहे़
शौचालय नसल्याने ग्रामस्थांना शौचासाठी बाहेर जावे लागत होते़ याबाबत शासनाच्या विविध योजना आहेत़ या योजनांतून गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित केले जात आहे़ या योजनेत शौचालय बांधकाम केल्यानंतर निधी देणे गरजेचे होते; पण वायगाव ग्रा़पं़ प्रशासन ग्रामस्थांना निधीसाठी पायपीट करण्यास बाध्य करीत आहे़ लाभार्थ्यांना निधी न देता कंत्राटदारांना देणार असल्याचे सांगितले जात आहे़ कंत्राटदाराद्वारे काम व्यवस्थित होत नसल्याची तक्रार पोटफोडे यांनी केली; पण आधी बांधकाम करा, नंतर अनुदान मिळेल, असे सांगण्यात आले़ यावरून शौचालयाचे बांधकाम झाल्यानंतर अनुदानाची मागणी केली असता ग्रा़पं़ प्रशासनाने शौचालयच नामंजूर केले़ या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ जि़प़ प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)
शौचालय बांधकामासाठी घ्यावे लागले कर्ज
वायगाव (निपाणी) येथे एक घर एक शौचालय योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम करण्यात सांगण्यात आले आहे़ यावरून गावातील लाभार्थ्यांनी कर्ज घेऊन शौचालयांचे बांधकाम केले; पण आता अनुदान देण्याची वेळ आली असताना ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत आहे़ या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे़
प्रेमिला पोटफोडे यांनीही कर्ज घेऊन शौचालयाचे बांधकाम केले़ त्या स्वत: बांधकाम करणार असताना ग्रा़पं़ ने जबरीने कंत्राटदार नेमला़ यानंतरही बांधकाम पोटफोडे यांनी केले; पण ग्रा़पं़ प्रशासनाने कंत्राटदाराला अनुदान देण्याचा हेका धरला आहे़ डोंगरे यांनीही उधारी करून शौचालय बांधले; पण ग्रा़पं अनुदान देत नसल्याने त्यांची गोची झाली आहे़
मी स्वत: बांधकाम करणार असताना ग्रामपंचायतीने कंत्राटदाराकडून बांधकाम करण्याची जबरी केली़ कंत्राटदाराने बांधकाम अर्धवट केले; पण पैसे पूर्ण घेतले़ आता ग्रामपंचायत कंत्राटदाराला अनुदान देणार असल्याचे सांगत आहे़ हा ग्रामपंचायतीचा हेकेखोरपणा आहे. बांधकामासाठी मी व्याजाने पैसे आणून दिले; पण अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही़
- प्रेमिला पोटफोडे, लाभार्थी, वायगाव (नि.)़
अधिकाऱ्यांनी शौचालय बांधकामासाठी परस्पर कंत्राटदार नेमला आहे़ याबाबत आम्हाला माहिती दिली नाही. शौचालयाचे सर्व्हे जागेवर बसून केल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. पाहणी करून लाभार्थ्यांना निधी देण्यात यावा.
- सुधीर पोहनकर, ग्रा़पं़ सदस्य, वायगाव (नि.)़
अशा व्यवहारांमुळे हागणदारी मुक्त गाव ही योजना फोल ठरू शकते. बांधकामाला मंजूरी दिली होती तर लाभार्थ्यांना निधी देणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना चकरा माराव्या लागण्यापेक्षा चौकशी करून निधी देणे गरजेचे आहे़
- सुनील तळवेकर, ग्रा़पं़ सदस्य, वायगाव (नि.)़