मृत कोविड बाधितांवर सावध राहुनच अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 05:00 AM2020-10-19T05:00:00+5:302020-10-19T05:00:16+5:30

आज किती मृत कोविड बाधितांवर अंत्यविधी करायचा याची माहिती सुरूवातीला स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याला दिली जाते. त्यानंतर स्मशानभूमीतील कर्मचारी सरण रचतात. पीपीई किट परिधान केलेल्या व्यक्तींनी शववाहिकेच्या सहाय्याने कोविड रुग्णालयातून स्मशानभूमीत आलेला मृतदेह थेट सरणावर ठेवला जातो. त्यानंतर या पार्थिवाला कोविड योद्धा म्हणून सेवा देणारे पालिकेचे पीपीई किट परिधान केलेले कर्मचारी मुखाग्नी देतात. जवळपास याच पद्धतीचा अवलंब करून काही मृत कोविड बाधितांवर दफनविधीही केला जात आहे.

Funeral of the dead Kovid with caution on the victims | मृत कोविड बाधितांवर सावध राहुनच अंत्यसंस्कार

मृत कोविड बाधितांवर सावध राहुनच अंत्यसंस्कार

Next
ठळक मुद्देपीपीई किट परिधान करून पार्थिवांवर विधी : वैकुंठधामातील प्रतिबंधीत क्षेत्रात सर्वसामान्यांना ह्यनो एन्ट्री

महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एखाद्या मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत आलेल्यांना कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून वर्धा शहरातील स्मशानभूमीत मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या परिसरात कुठल्याही नागरिकाला प्रवेश दिला जात नसून खबरदारीचे उपाय म्हणून पीपीई किट परिधान केलेले बोटावर मोजता येईल इतके व्यक्तीच या ठिकाणी मृत कोविड बाधितांवर शासकीय नियमांना अनुसरून अंत्यसंस्कार करीत असल्याचे लोकमतने रविवारी केलेल्या रिॲलिटी चेक मध्ये दिसून आले.

असा केला जातोय अंत्यविधी
आज किती मृत कोविड बाधितांवर अंत्यविधी करायचा याची माहिती सुरूवातीला स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याला दिली जाते. त्यानंतर स्मशानभूमीतील कर्मचारी सरण रचतात. पीपीई किट परिधान केलेल्या व्यक्तींनी शववाहिकेच्या सहाय्याने कोविड रुग्णालयातून स्मशानभूमीत आलेला मृतदेह थेट सरणावर ठेवला जातो. त्यानंतर या पार्थिवाला कोविड योद्धा म्हणून सेवा देणारे पालिकेचे पीपीई किट परिधान केलेले कर्मचारी मुखाग्नी देतात. जवळपास याच पद्धतीचा अवलंब करून काही मृत कोविड बाधितांवर दफनविधीही केला जात आहे.

एकाच वेळी नऊ मृतदेहांना मुखाग्नी देण्याची व्यवस्था
वर्धा शहरातील इतवारा भागातील स्मशानभूमी परिसरात मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. स्मशानभूमीचा हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. शिवाय तेथे एकाच वेळी नऊ मृत कोविड बाधितांना मुखाग्नी देता येईल, अशी व्यवस्था आहे. या ठिकाणी पाच स्मशानशेड तर चार स्मशान ओट्यांची व्यवस्था आहे. याच ठिकाणी दक्षता घेवून अंत्यविधी केले जात आहेत.

अंत्यसंस्कार करणारे कर्मचारीच मृताचे आप्त स्वकीय
कोरोना संकट आणि कोविड विषाणूचा प्रसार होऊ नये या हेतूला केंद्रस्थानी ठेवून मृत कोविड बाधिताची अंत्ययात्रा काढली जात नाही. शिवाय होणारा अंत्यविधी मृतकाच्या कुटुंबातील एक किंवा दोनच व्यक्तींना फार लांबून बघण्याची परवानगी दिली जाते. तर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारीच मृत व्यक्तीच्या आप्त स्वकीयाची भूमिका निभवून त्याच्यावर अंत्यविधी करून आपले कर्तव्य बजावण्यासह माणुसकीचा परिचय देत आहेत.

रविवारी झाले पाच मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार
कोविड-१९ या विषाणू संसर्ग झाल्यानंतर कोरोनाशी लढा देणाऱ्या पाच व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच पाच मृत कोविड बाधितांवर रविवारी इतवारा भागातील स्मशानभूमीत शासकीय नियमांना अनुसरून अंत्यसंस्कार करण्यात आले.

खबरदारीच्या उपायांची होतेय प्रभावी अंमलबजाणी
राज्यात काही ठिकाणी स्मशानभूमी कोरोनाच्या वाहक बनल्याचे उघडकीस आले आहे. असे असले तरी वर्धा शहरातील इतवारा भागातील हिंदू स्मशानभूमीत मृत कोविड बाधितांवर खबरदाच्या उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून अंत्यविधी केला जात असल्याने आतापर्यंत स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या एकाही कोविड योद्धाला कोरोनाचा संसर्ग झालेला नसल्याचे सांगण्यात आले.
हिवरातांडा नंतर प्रशासनाने बदलविली रणनीती
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथे १० मे रोजी जिल्ह्यातील पहिला कोविड बाधित सापडला होता. या मृत महिलेवर मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती. याच घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून मृत कोविड बाधितांवर अंत्यविधी करण्याच्या विषयात आपली रणनीती बदलविली होती, हे विशेष.
एकाच ठिकाणी होतेय अंत्यविधी
सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय तर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या कोविड बाधितांवर वर्धा शहरातील इतवारा परिसरातील वैकुंठधामात अंत्यसंस्कार केले जात आहे. आतापर्यंत दीडशेहून अधिक मृत कोविड बाधितांवर येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे येथील कोविड योद्धांना पालिका प्रशासन विविध साहित्य पुरवित आहे.

Web Title: Funeral of the dead Kovid with caution on the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.