अंत्यसंस्कार; तारासावंगा नि:शब्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 05:00 AM2021-09-17T05:00:00+5:302021-09-17T05:00:30+5:30
गाडेगाव येथील दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीर्थक्षेत्र झुंज येथील वर्धा नदीच्या पात्रामध्ये नावेच्या साहाय्याने जात असताना ११ जण नाव उलटल्याने नदी पात्रात बुडाले. यामध्ये तारासावंगा येथील आदिती सुखदेव खंडाळे (१३), मोनाली सुखदेव खंडाळे (१२), आश्विनी अमर खंडाळे (२१) व नवदाम्पत्य वृषाली अतुल वाघमारे (१९) आणि अतुल गणेश वाघमारे (२५) यांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तारासावंगा : अमरावती जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र झुंज येथील वर्धानदीच्या पात्रात नाव उलटल्याने ११ जणांना जलसमाधी मिळाली. यामध्ये तारासावंगा येथील पाच जणांचा समावेश असून तब्बल दोन दिवसांनंतर गुरुवारी पाचही जणांचे मृतदेह सापडले. याची माहिती गावात पोहोचताच नागरिकांनी नदीतीरावर धाव घेतली. शोकमग्न वातावरणात मृतदेह गावात आणून त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्याची गावातील ही पहिलीच घटना असून संपूर्ण गाव नि:शब्द झाले होते.
गाडेगाव येथील दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीर्थक्षेत्र झुंज येथील वर्धा नदीच्या पात्रामध्ये नावेच्या साहाय्याने जात असताना ११ जण नाव उलटल्याने नदी पात्रात बुडाले. यामध्ये तारासावंगा येथील आदिती सुखदेव खंडाळे (१३), मोनाली सुखदेव खंडाळे (१२), आश्विनी अमर खंडाळे (२१) व नवदाम्पत्य वृषाली अतुल वाघमारे (१९) आणि अतुल गणेश वाघमारे (२५) यांचा समावेश आहे. घटनेनंतर गावात एकच धावपळ उडाली. जिल्हा प्रशासनाने यंत्रणा कामाला लावून शोधमोहीम सुरू केली. राज्य आपत्ती विभागाच्या चमूकडून लागलीच शोध कार्य सुरू केले असता गुरुवारी सकाळी साडेपाच वाजतापासून राबविलेल्या मोहिमेदरम्यान सकाळी ११ वाजेपर्यंत आदिती खंडाळे, आश्विनी खंडाळे, वृषाली वाघमारे आणि अतुल वाघमारे या चौघांचे मृतदेह सापडले. याची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावावर दु:खाचा डोेंगर कोसळला. गावकऱ्यासह नातलगांनी घटनास्थळी धाव घेवून एकच हंबरडा फोडला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या आक्रोशामुळे सर्वत्र स्मशानशांतता पसरली होती. दुपारी चौघांचेही मृतदेह गावात आणल्यानंतर दोन सरणावर चौघांचे अंतिमसंस्कार करण्यात आला. या अंत्यसंस्काराकरिता वर्धा, अमरावती व नागपूर जिल्ह्यासह पंचक्रोशितील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास मोनाली खंडाळे हिचाही मृतदेह सापडल्याने तिच्यावरही सायंकाळी भर पावसात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेनंतर गेल्या दोन दिवसांपासून गावात एकाही घरी चूल पेटली नाही. पाचही जणांचे मृतदेह मिळेपर्यंत गावकऱ्यांनी अक्षरश: उपवासच केला होता.
रुग्णवाहिकेतून झाले मुखदर्शन
- गुरुवारी दुपारी चौघांचे मृतदेह गावात आणण्यात आले. मृतदेहांचे शवविच्छेदन केले असल्याने आई-वडिलांसह नातलगांना रुग्णवाहिकेतूनच मृतदेहांचे मुखदर्शन घेतले. यावेळी आक्रोशाने परिसर दणाणून गेला होता. हे दृश्य पाहून उपस्थितांच्याही डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. रुग्णवाहिकेतूनच मृतदेह गावातील भडक नाल्याच्या काठावर नेण्यात आले. तेथे दोन सरणावर चारही मृतदेहांना मुखाग्नी देण्यात आला. या अंत्यसंस्काराला जि. प. सदस्य अंकिता होले, जि. प. सदस्य त्रिलोकचंद कोहळे, उपसभापती गोविंद खंडाळे, गटविकास अधिकारी बारापात्रे, आष्टीचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे, पोलीस उपनिरीक्षक देरकर, सचिन होले, गजानन भोरे, पोलीस पाटील अंजली कडू, सरपंच शीतल खंडाळे, विस्तार अधिकारी वानखेडे, अमर गोरे, आशिष फडफड, देवानंद पेठे, प्रशांत काकपुरे, ग्रामसेवक कटकतलवारे, माधव मानमोडे तसेच गावातील शिक्षक व नागरिक उपस्थित होते.
नवदाम्पत्याच्या आयुष्याचा शेवटही सोबतीनेच...
nमहिन्याभरापूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या अतुल व रूपाली वाघमारे परिवारासोबत दशक्रियेच्या कामाला गेले होते. नवीन आयुष्याचे स्वप्न रंगवित नावेतून प्रवास करीत असतानाच नाव उलटली आणि स्वप्नांचाही चुराडा झाला. नियतीच्या या घाताने दोघांचाही सोबतच शेवट झाला. त्यामुळे मृतदेह सापडल्यानंतर दोघांवरही एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
झुंज येथील घटनेत माझ्या दोन्ही मुली पाण्यात बुडाल्या. मोठी आदिती आणि लहान मोनाली दोघीही अभ्यासू आणि परिवाराच्या फार लाडक्या होत्या. मी हातमजुरी करून दोन्ही मुलींचा सांभाळ केला. पण, आता त्याच नसल्याने घराचं घरपण हिरावून गेलं आहे. आमचा मोठा आधार अचानक निघून गेल्याने या दु:खातून कसे सावरणार?
- सुखदेव खंडाळे, मोनाली व आदितीचे वडील