वर्धा जिल्ह्यात मृत माकडावर केला अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:49 AM2018-01-18T11:49:24+5:302018-01-18T11:51:46+5:30
येथील मंगळवारपुरा भागात मानवी देहाप्रमाणेच शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीचे सर्व संस्कार यावेळी पार पडले. या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: येथील मंगळवारपुरा भागात मानवी देहाप्रमाणेच शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीचे सर्व संस्कार यावेळी पार पडले. या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा आहे.
मंगळवारपुरा वॉर्डात आनंद निंबेकर यांच्या घरासमोर जीवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने एका माकडाचा मृत्यू झाला. उड्या मारत असलेले माकड अचानक मृत झाल्याचे उपस्थित तरूणांना लक्षात आले. आनंद निंबेकर यांनी माकडावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. त्याच्या या निर्णयाला काही तरुणांनीही होकार दर्शवित सहकार्य केले. वेळीच तिरडीसह अंत्यसंस्काराचे सर्व साहित्य विकत आण्यात आले. शेकडोंच्या उपस्थितीत त्या माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उमेश निचत याने आकटे धरत सुतकही पाळले. दसवाच्या दिवशी घास टाकण्यात आला. शहीद स्मारकाच्या जवळस माकडाचा दफनविधी करण्यात आला. यावेळी आदर्श बाल दुर्गा मंडळाचे सदस्य व बाबू राणे, डॉ. प्रदीप राणे, किरण जयसिंगपुरे, किशोर इंगळे, प्रमोद डांगे, अजय बानाईत, उमेश निचत आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचीही मोठी उपस्थिती होती.