लगीनघाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2016 02:53 AM2016-04-20T02:53:25+5:302016-04-20T02:53:25+5:30

मराठवाड्यातील वातावरण दोन्ही अर्थांनी तापले आहे. एक तर तपमानाने ४२ अंशाचा आकडा ओलांडला आणि लग्नाचेही बार उडत आहेत.

Furious! | लगीनघाई!

लगीनघाई!

Next

मराठवाड्यातील वातावरण दोन्ही अर्थांनी तापले आहे. एक तर तपमानाने ४२ अंशाचा आकडा ओलांडला आणि लग्नाचेही बार उडत आहेत. दुष्काळी मराठवाड्यात सारेच पक्ष सामूहिक विवाहाचा बार उडवताना दिसत आहेत. कोणाचा वेल मांडवावर जात असेल तर आडकाठी आणू नये अशी ग्रामीण भागात लोकांची धारणा असते. त्यामुळे हे सामूहिक विवाह सोहळे यशस्वी होताना दिसत आहेत.
परवा शिवसेनेचा विवाह सोहळा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत औरंगाबादेत पार पडला, तर रविवारी बीड आणि जालना येथे भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत बार उडवला. यात काँग्रेसही मागे नाही. १ मे रोजी आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये आणखी एक सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. या सर्व घडामोडींवरून येत्या दोन-पाच वर्षांत राजकीय पक्षांनी असे सोहळे आयोजित करण्याचा पायंडाच पडला तर नवल नाही. आपापली ‘मतपेटी’ सुरक्षित करण्याचा हा मार्ग राजकीय पक्षांनी अनुसरला. आजवर सामूहिक विवाह हा समाजातील चुकीच्या प्रथांना तिलांजली देऊन कमीत कमी खर्चात असे सोहळे पार पाडण्याचा आदर्श मार्ग समजला जात होता. आजही अनेक समाजांमध्ये असे विवाह होतात; पण ही राजकीय लगीनघाई या वर्षी लक्ष वेधून घेत आहे.
दोन दिवसांच्या तीन सोहळ्यांमध्ये विहिणींचे रुसवे-फुगवे दिसले नाहीत; पण राजकीय रुसव्या-फुगव्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. बीडजवळ पालवण येथे आमदार विनायक मेटेंच्या सामूहिक विवाहाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, कोणाचीही हजेरी नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर भाजपातील ही दुफळी उघडपणे दिसत होती. बीड भाजपामधील पंकजा मुंडे-पालवे विरुद्ध विनायक मेटे यांच्यातील गटबाजीचे दर्शन झाले आणि ते अपेक्षित होते. कारण या दोघांमधून विस्तव जात नाही, अशी परिस्थिती आहे. किमान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला तोंड देखले का होईना भाजपाचे नेते, कार्यकर्ते येतील असा अंदाज होता, पण तो चुकला.
इकडे जालन्यात मात्र खासदार रावसाहेब दानवेंनी आपली पकड दाखवून दिली. जालन्याच्या सोहळ्यालाही मुख्यमंत्री होते; पण औरंगाबादमधील नेतेमंडळीसुद्धा हजर होती. त्यामुळे हा सोहळा दणकेबाज झाला असेच म्हणावे लागेल. यातून दानवेंनी आपले शक्तिप्रदर्शन दाखवून दिले. त्यापेक्षा मतदारसंघात उभे केलेले कार्यकर्त्यांचे जाळे आणि कार्यक्रमातील नियोजन दिसले. पक्षाच्या दृष्टीने हा विवाह सोहळा ‘मतपेटी’ मजबूत करणारा ठरला.
औरंगाबादेत शनिवारी शिवसेनेने सोहळा घेतला. पक्षांतर्गत विरोधकांच्या कारवायांमुळे अगोदरच त्रस्त झालेले खासदार चंद्रकांत खैरे यांची अवस्था वधूपित्यासारखी होती. २६ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री रामदास कदम यांनी उघडपणे खैरेविरोधी भूमिका घेतल्यानंतर ते सातत्याने अडचणीत आहेत. कामात अडथळे उभे करण्याचे काम शिवसेनेतून होत असताना खैरेंनी एकहाती हा सोहळा यशस्वी करून दाखविला. या कामात त्यांना संघटनेतून साथ नव्हतीच; पण सेनेची महिला आघाडी भक्कमपणे खैरेंच्या मागे उभी राहिली. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे खैरे विरोधकांना सोहळ्यात हजेरी लावावी लागली. बीडप्रमाणे येथे गटबाजीचे दर्शन झाले नाही, ही शिवसेनेची जमेची बाजू. भाजपा स्वत:ला शिस्तबद्ध पक्ष म्हणवून घेतो; पण खुद्द मुख्यमंत्र्यांच्या समोर गटबाजीचे झालेले प्रदर्शन हे पक्षातील असंतोष दर्शविते.
यापाठोपाठ आता सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या सोहळ्याकडे लक्ष लागले आहे. सत्ताधाऱ्यांच्या लगीनघाईत काँग्रेस किती बाजी मारते, हे पाहणे मनोरंजक ठरेल.
- सुधीर महाजन

Web Title: Furious!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.