आधुनिकतेच्या गर्तेत गारुडी आणि मदारी झाले दिसेनासे
By admin | Published: October 27, 2015 03:17 AM2015-10-27T03:17:50+5:302015-10-27T03:17:50+5:30
कामाच्या धावपळीत विरंगुळा म्हणून मनोरंजन हा घटक मानवी जीवनात अविभाज्य राहिला आहे. कालानुरुप मनोरंजनाच्या
वर्धा : कामाच्या धावपळीत विरंगुळा म्हणून मनोरंजन हा घटक मानवी जीवनात अविभाज्य राहिला आहे. कालानुरुप मनोरंजनाच्या साधनात बदल होत गेले. याचा परिणाम म्हणून मनोरंजनाची पूर्वीची अनेक साधने पडद्याआड गेलेली पाहायला मिळतात. शहरातील चौकात होणारे मदारीचे खेळ आता दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे यावर उदरनिर्वाह करणारे कुटुंब उघड्यावर आले आहे.
आधुनिक युगात सतत होणाऱ्या बदलाने अनेकांची पोट भरण्याची साधने हिरावली गेल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे त्यांना नवीन पर्याय शोधावा लागला आहे. शासनाकडून या घटकांकरिता विविध योजना आखण्यात आल्या आहे. वन्यप्राणी संरक्षण कायद्यान्वये माकडे, साप, अस्वले असे प्राणी बाळगणे गुन्हा असल्याने यावर आधारित पारंपरिक व्यवसाय करणारे गारुडी, मदारी आज दिसेनासे झाले आहेत.
थ्रीजी, फोरजीच्या या काळात अगदी लहानपणापासून मोबाईल हाताळणाऱ्या बच्चे कंपनीस हे गारुडी, मदारी चित्रातच पाहावे लागत आहेत. काही वर्षापूर्वी गारुडी साप-मुंगसाच्या लढाईत पे्रक्षकांना खिळवून ठेवायचा. तद्वतच मदारी डमरुच्या डुबू-डुबूच्या तालावर ‘मै मयके नही जाऊंगी’ या गाण्यावर माकड-माकडीणीेंचे नृत्य निखळ मनोरंजन करायचे. पूर्वी गावखेड्यात मनोरंजनाकरिता रेडिओ, कृष्णधवल टीव्ही संचासह गावात अधुनमधून येणारे गारुडी, मदारी, बहुरुपी गावात येऊन ग्रामस्थांचे मनोरंजन करायचे. गारुडी आला की गावात एकच गर्दी जमायची. गारुडी त्याच्याकडे असलेले छोटे-मोठे साप, मुंगुस याचे खेळ दाखवित. एकंदरीत गारुडी, मदारी गावकऱ्यांच्या मनोरंजनाचे दुवे होते. मात्र हे खेळे आता ग्रामीण भागातून नामशेष होत असल्याचे दिसते.
वर्षभर गावखेड्यात भटकंती करुन लोकांचे मनोरंजन करुन त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. वािर्षक जत्रेमध्ये मदारीची उपस्थिती असत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पूर्वींची मनोरंजनाची साधने कालबाह्य ठरली. या ही कुटुंब उघड्यावर आल्याचे दिसते.(स्थानिक प्रतिनिधी)