जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी घेणार गगन भरारी
By Admin | Published: December 5, 2015 09:08 AM2015-12-05T09:08:24+5:302015-12-05T09:08:24+5:30
‘घेईन मी उंच भरारी आकाशात’ या अनोख्या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील दारिद्र्यरेषेखालील प्रावीण्यप्राप्त २५ विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीचा प्रवास घडवणार आहे.
मिलिंद भेंडे यांची माहिती : २५ गुणवत्ताप्राप्त गरीब विद्यार्थ्यांना घडणार विमान प्रवास
वर्धा : ‘घेईन मी उंच भरारी आकाशात’ या अनोख्या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील दारिद्र्यरेषेखालील प्रावीण्यप्राप्त २५ विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीचा प्रवास घडवणार आहे. संसदेला हे विद्यार्थी भेट देऊन परत विमानाचा प्रवास करतील, अशी माहिती जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती मिलिंद भेंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यार्थ्यांची निवड प्रक्रियाही गमतीशीर आहे. आठही पंचायत समितीस्तरावरील प्रत्येक शाळेतून दारिद्र्य रेषेखालील व गुणवत्ताप्राप्त पाच विद्यार्थ्यांची निवडले जाईल. प्रत्येक शाळेने निवडलेल्या पाच विद्यार्थ्यांची सोडत काढली जाणार आहे. या माध्यमातून प्रत्येक पंचायती समितीस्तरावर तीन याप्रमाणे २५ विद्यार्थ्यांची निवडले जाणार. यातून विद्यार्थ्यांना हा विमान प्रवास घडणार आहे. खा. रामदास तडस हे स्वत: या विद्यार्थ्यांना दिल्लीला संसद भवन दाखविणार आहेत. विद्यार्थ्यांचा हा विमान प्रवास हिवाळी अधिवेशनादरम्यान घडविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचेही मिलिंद भेंडे म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी)
डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी
रक्तदानाचा नवा विक्रम करणार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जन्मशताब्दी वर्ष आहे. या अनुषंगाने ६ डिसेंबरला डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी महारक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व आरोग्य विभाग करीत आहे. पंचायत समितीस्तरावरील या शिबिरात जिल्ह्यातील ४७० जणांच्या रक्तदानाचा जुना विक्रम मोडीत १ हजार रक्तदाते रक्तदान करण्याचा नवा विक्रम करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहे. शिबिरात शिक्षक व पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधीही सहभाग नोंदवून रक्तदान करतील. शिक्षकांकडून संकल्पपत्रही भरुन घेतले जात आहे. वर्धेला पंचायत समिती, तर सेलू, समुद्रपूर, देवळी, आष्टी व कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय आणि हिंगणघाट व आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात या शिबिराचे स्थळ निश्चित करण्यात आले आहे, अशी माहितीही सभापती मिलिंद भेंडे यांनी दिली.
जि.प.चा आरोग्य विभाग उघडणार
‘रक्तदाता’ संकेतस्थळ
रक्ताची वाढती मागणी आणि वेळेवर रुग्णाला रक्तपुरवठा व्हावा, या उद्दात्त हेतूने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘रक्तदाता’ नावाने संकेतस्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ जानेवारीपासून हे संकेतस्थळ कार्यान्वित होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद शिक्षक, कर्मचारी, अधिकाऱ्यांची नावे, त्यांचा रक्तगट आणि संपर्क क्रमांक असणार आहे. यामध्येही रक्तदात्यांची नावे तालुकानिहाय असणार आहे. तसेच शिक्षक, कर्मचारी, अधिकारी याप्रमाणे श्रेणीनुसार नावे असणार आहे. या संकेतस्थळावर इतरांनाही आपले नाव, रक्तगट व संपर्क क्रमांक नोंदविता येण्याची सोय असणार आहे, अशी माहितीही सभापती भेंडे यांनी यावेळी दिली.