विदेशी पक्ष्यांच्या आगमनाने गजबजली जलाशये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 09:47 PM2018-12-17T21:47:06+5:302018-12-17T21:47:58+5:30
हिवाळा लागला की उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशामध्ये अन्नाची कमतरता जाणवत असून थंडीही पक्ष्यांना असह्य होते. त्यामुळे अन्नाच्या शोधात आणि थंडीपासून रक्षण करण्यासाठी हजारो मैलाचा प्रवास करीत असंख्य पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात.
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हिवाळा लागला की उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशामध्ये अन्नाची कमतरता जाणवत असून थंडीही पक्ष्यांना असह्य होते. त्यामुळे अन्नाच्या शोधात आणि थंडीपासून रक्षण करण्यासाठी हजारो मैलाचा प्रवास करीत असंख्य पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात. असे पक्षी आता वर्ध्यातील तलाव, नदी व जलाशयाकडे कुच करीत आहे. सध्या या विदेशी पाहुण्यांची संख्या कमी असली तरी डिसेंबरच्या अखेरपर्यंत ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या विदेशी पाहुण्यांचे आगमन पक्षीपे्रमींंसाठी पर्वणीच ठरत आहे. हिवाळ्यात नियमित स्थलांतर करुन येणारे पक्षी जिल्ह्यातील विविध तलाव, नदी व जलाशयावर पहावयास मिळत आहे. आतापर्यंत चक्रवाक, पट्टकादंब, तलवार बदक, चक्रांग, तरंग बदक, मोठी लालसरी,मलिन बदक, शेकाट्या, सामान्य पाणलावा, सामान्य हिरवा टिलवा, हिरवी तुतारी यासह काळा करकोचा, सर्पपक्षी, पिवळा धोबी, आॅस्प्रे आदी पक्षी आढळून आले आहेत. स्थलांतरीत पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आणखी काही प्रकार व संख्या वाढण्याची शक्यता आहे. पक्षी अभ्यासक व निसर्गप्रेमिंसाठी हा कालावधी आनंद व उत्साहाचा असतो. या दिवसात जिल्ह्यातील जलाशयाकडे साऱ्यांचीच पक्षी निरिक्षणासाठी धाव असते.सुट्टीच्या दिवसात तर पक्ष्यांचे थवे पाहण्यासाठी पक्षी अभ्यासक व पक्षीपे्रमींचेही जथ्थे लपून-छपून पक्षांच्या हालचाली आपल्या नजरेत कैद करुन घेतात. सध्या वाढत्या प्रदुषणाचा फ टका या पाणपक्षांच्या अधिवासालाही बसत आहे. या अधिवासांचा ऱ्हास होत असल्याने गाळपेरा आणि झिरो फिशींग नेट च्या परिणामामुळे स्थलांतरीत पक्षांची संख्या दिवसेदिवस रोडावत असल्याचे मत पक्षीपे्रमींकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या सुवर्णक्षणालाही मुकावे लागणार असल्याची खंत पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
पक्ष्यांच्या नोंदी ‘ई-बर्ड’ या संकेतस्थळावर कराव्या
पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने हे क्षण डोळ्यात साठविण्यासाठी पक्षीप्रेमिंनी निरिक्षणासाठी बाहेर पडावे. पक्षी निरिक्षणासाठी जाताना पक्ष्यांना त्रास होणार नाही, याची काळजी निसर्गप्रेमींनी घ्यावी. तसेच शाळा व महाविद्यालयांनीही स्थलांतरीत पक्षीनिरिक्षणासाठी परिसरातील तलावावर शैक्षणिक सहली काढाव्यात.सोबतच आढलेल्या पक्ष्यांच्या नोंदी ‘ई-बर्ड’ या संकेतस्थळावर कराव्या, असे आवाहन बहार नेचरचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखेडे, उपाध्यक्ष रविंद्र पाटील, दिलीप वीरखेडे, राहुल तेलरांधे, डॉ.बाबाजी घेवडे, संजय इंगळे तिगावकर, दीपक गुढेकर, डॉ.जयंत वाघ, जयंत सबाने, वैभव देशमुख, राहुल वकारे, स्रेहल कुबडे, अविनाश भोळे, विनोद साळवे यांनी केले आहे.
रणगोजा पक्ष्यांची वर्ध्यात प्रथमच नोंद
हिवाळी पाहुणा मुख्यत्वे वाळवंटी प्रदेशात अधिवास असणारा व विदर्भात तुरळक प्रमाणात नोंद करण्यात आलेला रणगोजाची वर्धा जिल्ह्यात प्रथमच नोंद करण्यात आली आहे. पक्षीनिरीक्षणादरम्यान बहार नेचर फाऊंडेशचे दर्शन दुधाने व आशुतोष विभारे यांना हा पक्षी आर्वी तालुक्यात आढळून आला. जिल्ह्यात दाखल झालेल्या पाहुण्या पक्षांमध्ये प्रथमच करण्यात आलेली रणगोजाची नोंद महत्वपुर्ण ठरली आहे. रणगोजा हा पक्षी आकाराने चिमणी एवढा असतो. साधारणत: पिवळट पांढऱ्या रंगाचा हा पक्षी असून नराचा कंठ व डोक्याखालील भागाचा रंग काळा, भुवई पिवळट तर शेवटीचा रंग काळपट असणारा हा पक्षी दिसायला फार सुंदर दिसतो. मराठीत रणगोजासह रणगप्पीदास असेही नाव आहे. या पक्ष्याची वीण बलुचीस्तान या भागात तर त्याची हिवाळातील व्याप्ती राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्रापर्यंत असते. निमवाळवंटी ओसाड प्रदेश आणि वाळवंटी भागातील ओलीताचे क्षेत्र हा त्याचा अधिवास असतो.