अतिक्रमणावर चालला गजराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:47 PM2017-11-24T23:47:04+5:302017-11-24T23:47:18+5:30
शहरातील टिळक चौक ते तुकडोजी पुतळा या मुख्य मार्गावरील अनेकांचे अतिक्रमण काढण्यात आले तर काहींनी स्वत:च अतिक्रमण काढून घेत आपले होणारे नुकसान टाळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शहरातील टिळक चौक ते तुकडोजी पुतळा या मुख्य मार्गावरील अनेकांचे अतिक्रमण काढण्यात आले तर काहींनी स्वत:च अतिक्रमण काढून घेत आपले होणारे नुकसान टाळले. पुढच्या ३ ते ४ दिवसांत ही मोहीम शहरभर राबविण्यात येणार आहे.
शहरात बोकाळलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद होत आहे. ही अतिक्रमणाची मोहीम नगर पालिका हिंगणाघाट यांच्यावतीने कार्यान्वित करण्यात आली. आज दिवसभर चालणारी मोहीम अन्य भागातील अतिक्रमण व हिंगणघाट नगर पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी श्रीकृष्णकांत पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. पालिकेचे अधिकारी माळवे, तळवेकर, अली, सुनील घोडमारे, प्रकाश कोल्हे, आदींचे सहकार्य होते. पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून वर्धेहून अतिरिक्त पोलीस बळ यासाठी मागविण्यात आला होता. संबंधित अन्य शासकीय अधिकाºयांची उपस्थित होती. नायब तहसीलदार तायडे, पोलीस सब इन्स्पेक्टर कोल्हे यांची उपस्थिती होती.
शहरातील एस.एस.एम. कन्या शाळा रस्त्यावर तसेच अन्य भागातील मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे. अतिक्रमणात अनेक पानठेले, चहा टपरी, तसेच लहान छोट्या दुकानदारांना हुसकविण्यात आले असून अनेक व्यावसायिकांचे बाहेरचे टिनाचे शेड यांच्यावर जेसीबीने झडप दिली. अनेकांचे शेड पाडण्यात तर समोर आलेले अतिक्रमण हटविण्यात आले. मोहीम आणखी तीन-चार दिवस चालविण्यात येणार असून शहरातील सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मोहीमेत जेसीबी, ट्रॅक्टर, आणि अन्य वाहन मदतीला होती.
वर्षानुवर्षांचे अतिक्रमण भुईसपाट
शहरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मागील अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे. या अतिक्रमणामुळे रस्त्यावरून वाहन चालविताना हा रस्ता आहे की बोळ, असा भास होत होता. अतिक्रमण काढताच रस्त्याची रूंदी वाढली आणि वाहतुकीचीही समस्या मार्गी लागल्याच्या प्रतिक्रीया या भागातील नागरिक देत आहेत. पालिकेच्यावतीने ही मोहीम अशीच सुरू ठेवावी, अशी मागणी होत आहे.