शिवाजी चौकातील अतिक्रमणावर गजराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:57 PM2018-02-10T23:57:16+5:302018-02-10T23:57:30+5:30
शहरातील मुख्य मार्गावर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. या दुकानमालकांना अतिक्रमण काढण्याच्या अनेकवार नोटिसी बजावल्या; मात्र त्याकडे दुकानमालकांनी दुर्लक्ष केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील मुख्य मार्गावर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. या दुकानमालकांना अतिक्रमण काढण्याच्या अनेकवार नोटिसी बजावल्या; मात्र त्याकडे दुकानमालकांनी दुर्लक्ष केले. यामुळे अखेर पालिकेच्यावतीने शनिवारी अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली.
पालिकेच्यावतीने आज सकाळी १० वाजताच्या सुमारास ही मोहीम रबविणे सुरू केले. प्रारंभी शिवाजी चौकात कारागृहाच्या भिंतीलगत असलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे. यानंतर ही मोहीम शहरातील मुख्य मार्गाने बजाज चौक परिसराकडे वळली. यात ठाकरे मार्केट परिसरातील पानटपऱ्यांची छते काढण्यात आली. तर त्यांना टपऱ्या तत्काळ उचलण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. पण त्यांनी दुर्लक्ष केले.
अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. या अतिक्रमणाला प्रारंभी काही व्यावसायिकांकडून विरोध करण्यात आला. या विरोधाला पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बगल देण्यात आल्यानंतर अतिक्रमण काढण्यात आले. ही मोहीम आणखी काही दिवस राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली.
यावेळी प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, नगर अभियंता सुधीर फरसोले, निखिल लोहवे, निलेश नंदनवार, अनुप अग्रवाल, विपीन गोटेकर, अशोक ठाकूर, चेतन खंदारे यांच्या पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
छोट्यांवरच कारवाई, मोठ्यांना बगल
नगर परिषदेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना नेहमीच छोट्या व्यापाऱ्यांवरच कार्यवाही केली जाते. रस्त्याच्या कडेला दुकान लावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांवरच गजराज चालविला जातो. शहरात अनेक मोठ्या व्यापाऱ्यांकडून पक्के अतिक्रमण केले आहे. याकडे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. ते अतिक्रमण काढताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वेळ टाळली जाते, असा आरोप छोट्या व्यवसायिकांकडून यावेळी करण्यात आला. पालिकेच्यावतीने मोठ्या व्यापाºयांच्या अतिक्रमणावरही गजराज चालवावा अशी मागणी आहे.
नागरिकांची गर्दी
वर्दळीचा चौक असलेल्या शिवाजी चौक परिसरात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या अनेकांकडून ती पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला असला तरी या चौकात बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
स्वच्छ शहराकरिता मोहीम
पालिकेच्यावतीने स्वच्छ शहर अभियान राबविले जात आहे. अभियानात अनेक ठिकाणी सौदर्यीकरण करण्यात येत आहे. या सौदर्यीकरणात ही दुकाने अडसर ठरत असल्याने ती काढण्यात येत असल्याची माहिती मोहिमेत सहभागी असलेल्या पालिकेच्या कर्मचाºयांकडून देण्यात आली. रोजगारावर गजराज चालवून कोणते सौदर्यीकरण करण्यात येईल, असा प्रश्न विचारल्या जात आहे.