५० झोपड्यांवर चालला गजराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:25 AM2018-03-22T00:25:03+5:302018-03-22T00:25:03+5:30
नजीकच्या बोरगाव (मेघे) वॉर्ड ५ मध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या होत्या. त्या सुमारे ५० झोपड्या बुधवारी बोरगाव (मेघे) ग्रा. पं. प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : नजीकच्या बोरगाव (मेघे) वॉर्ड ५ मध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या होत्या. त्या सुमारे ५० झोपड्या बुधवारी बोरगाव (मेघे) ग्रा. पं. प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या आहे. या ठिकाणी जलकुंभ तयार होणार आहे. सदर अतिक्रमण नागरिकांनी स्वत:च काढून टाकावे अशा सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे ग्रा.पं. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बोरगाव (मेघे) वॉर्ड ५ येथील चितोडा मार्गावरील ग्रामपंचायतीच्या अधिनस्त असलेली महसूल विभागाची झुडपी जंगली जागा आहे. तेथे काही महिन्यांपूर्वी परिसरातील काही नागरिकांनी थेट अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या होत्या. नागरिकांचा हा प्रकार गाव विकासाच्या कामाला अडचण निर्माण करणारा असल्याने सुरूवातीला बोरगाव (मेघे) ग्रामपंचायत प्रशासनाने झोपड्या बांधणाºया नागरिकांना सदर अतिक्रमण त्यांनी स्वत:च काढण्यासंबंधीचा नोटीस बजावला होता. त्याकडे अतिक्रमण धारकांनी पाठ दाखविल्याने त्यानंतर परिसरात दवंडी देण्यात आली;पण त्याकडेही दुर्लक्ष करीत अतिक्रमण कायम राहिल्याने बुधवारी ग्रामपंचायत प्रशासनाने थेट अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.
सदर जागेवर सुमारे ५० कुटुंबियांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या होत्या. घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रा.पं.च्या पथकाने बुधवारी सुरूवातीला अतिक्रमण धारकांनी अर्ध्यातासात स्वत:च अतिक्रमण काढण्याच्या सुचना दिल्या. त्या अनुषंगाने काही अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण काढले. मात्र, काही अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमण कायम ठेवल्याने शेवटी ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढून परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला.
ही कारवाई बोरगाव (मेघे)च्या सरपंच योगीता देवढे, ग्रामविकास अधिकारी डी. दिवटे, उपसरपंच मोहन येरणे, तलाठी सुनील ठाकरे, मनोज चौधरी, सुरजीत चौधरी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खेकाडे, चोपडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत तणावपूर्ण शांततेत करण्यात आली. सदर जागेवर जलकुंभ बांधण्यात येणार असल्याने सरपंच देवढे यांनी सांगितले.
परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाकडून शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान तगडा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. ज्या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली तेथे मार्शल पथक एक, दोन व तीनसह शहर ठाण्यातील पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलीस बंदोबस्तामुळे परिसराला काही काळासाठी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. ग्रा.पं.ने तणावपूर्ण शांततेत मोहीम राबविली.
झाले होते आरोप-प्रत्यारोप
बोरगाव (मेघे) वॉर्ड ५ भागातील ज्या ठिकाणचे अतिक्रमण बुधवारी काढण्यात आले. त्याच अतिक्रमण धारकांकडून बोरगाव (मेघे) मधील एका ग्रा. पं. सदस्याने जागा देतो म्हणून पैसे घेत अतिक्रमण धारकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण शहर पोलिसांपर्यंतही पोहोचले होते. शेवटी आज वॉर्ड ५ मधील अतिक्रमण काढण्यात आल्याने सदर आरोपांना अर्धविराम मिळाला असल्याची परिसरात चर्चा होती.