अतिक्रमणावर चालला गजराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:01 PM2019-06-28T22:01:16+5:302019-06-28T22:01:33+5:30
बुटीबोरी-तुळजापूर महामार्गाचे चौपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरील अतिक्रमण काढण्याकरिता प्रशासनाकडून धडक मोहीम राबविण्यात आली. यात अनेक बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांची निवासस्थानेही जमीनदोस्त करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : बुटीबोरी-तुळजापूर महामार्गाचे चौपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरील अतिक्रमण काढण्याकरिता प्रशासनाकडून धडक मोहीम राबविण्यात आली. यात अनेक बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांची निवासस्थानेही जमीनदोस्त करण्यात आली.
बुटीबोरी-तुळजापूर महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. रस्ता बांधकामात अतिक्रमण अडथळा ठरत असल्याने सेलडोह येथील जवळपास ३० ते ४० जणांची घरे पाडण्यात आली. यातील काहींनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढले. यातील काहींची घरे शुक्रवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान सकाळी ७ वाजतापासून तर दुपारी २ वाजतापर्यंत जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली. यात पंचायत समिती सभापतींचेही घर पाडण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केसरीचंद खंगार यांच्या रोपवाटिकेतील कित्येक वर्षे जुनी झाडे पाडण्यात आली. यात त्यांचे मोठे नुकसान झाले असून भरपाई कोण देणार? असा त्यांचा सवाल आहे. अनेक वर्षांपासून डौलाने उभ्या असलेली निवासस्थाने भुईसपाट झाल्याने रस्त्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. रस्ता रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम करण्यासाठी आड येत असलेल्या घराच्या मोबदल्याची संपूर्ण रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात वर्ग झाली आहे. केवळ घर पाडण्यासाठी व त्यातील साहित्य इतर ठिकाणी कामी येऊ शकत होते, ते काढण्यासाठी संबंधितांना सहा महिन्यांची मुभा देण्यात आली होती. मात्र, याकडे अनेकांनी कानाडोळा केला. अखेर शुक्रवारी शिल्लक राहिलेली घरे जेसीबी मशीन लावून पाडण्यास कंपनीने सुरुवात केलीे. नागरिकांची याबाबत कोणतीही तक्रार नाही. मात्र, शिल्लक राहिलेला व महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे भूखंडांचा फेरफार न झाल्यामुळे जमिनीचा मोबदला न्यायालयीन लढाईत अडकला असल्याने तो केव्हा मिळणार, याकडे पीडितांचे लक्ष लागले आहे. जागेचा योग्य मोबदला लवकर मिळाल्यास स्थायी स्वरूपात हक्काच्या घराची उभारणी करून वास्तव्यास जाऊ, असे पीडित बोलत आहेत. शेषराव सोनटक्के यांना तीन सर्र्व्हे नंबरपैकी दोन सर्व्हे नंबरमधील मोबदला मिळाला आहे. एका सर्व्हे नंबरचा मोबदला मिळाला नसतानाही घर पाडण्यात आले. त्यामुळे मोबदला कोण देणार? असा प्रश्न उपस्थित केला.यावेळी तहसीलदार महेंद्र सोनोने, ठाणेदार प्रल्हाद काटकर, सिंदीचे ठाणेदार हेमंत चांदेकर, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण भाकरे, तलाठी मानकर व मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती.
सालोड (हिरापूर) मध्येही कारवाई
बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई सालोड (हिरापूर) येथेही करण्यात आली. सकाळपासून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी महसूल अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौपदीकरणाच्या आड येणारे अतिक्रमन हटविण्यात आले. नागरिकांनीही याला सहकार्य केल्याने रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला.