अतिक्रमणावर पुन्हा चालला गजराज
By admin | Published: January 21, 2016 02:00 AM2016-01-21T02:00:42+5:302016-01-21T02:00:42+5:30
नगर परिषद प्रशासनाच्यावतीने वारंवार अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाते; पण ते पुन्हा जैसे थे होते. यामुळे आता अतिक्रमण हटविण्याकरिता पालिकेने पथकच तयार केले.
नगर परिषदेची धडक कारवाई : तीन दिवस चालणार मोहीम, फिरत्या पथकाचा वॉच
वर्धा : नगर परिषद प्रशासनाच्यावतीने वारंवार अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाते; पण ते पुन्हा जैसे थे होते. यामुळे आता अतिक्रमण हटविण्याकरिता पालिकेने पथकच तयार केले. तीन दिवस ही अतिक्रमण हटाव मोहीम धकडपणे राबविली जाणार आहे. बुधवारी बजाज चौक ते रेल्वेस्थानक मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात आले.
न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या उपस्थितीत नगर अभियंता सुधीर फरसोले, आरोग्य निरीक्षक रवींद्र टप्पे यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. बजाज चौक येथील भाजी बाजार परिसरात रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. फळ व अन्य विक्रेत्यांनी रस्त्यापर्यंत लावलेले शेड काढण्यात येऊन जेसीबीच्या साह्याने सदर परिसर खोदून काढला. बजाज चौकातील सुमारे दहा विक्रेत्यांची अतिक्रमणे काढण्यात आली. यापूढे अतिक्रमण केल्यास दंडात्मक तसेच जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
बजाज चौक ते रेल्वेस्थानक या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळ व भाजीविक्रेते रस्त्यापर्यंत हातगाड्या लावून व्यवसाय करतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. हे अतिक्रमण कित्येक वेळा हटविण्यात आले; पण सदर विक्रेते पुन्हा तेथेच बंड्या लावत असल्याने परिस्थिती जैसे थे होते. १९ ते २१ जानेवारीपर्यंत असेलली ही अतिक्रमण हटाव मोहीम मंगळवारी पोलीस ताफा उपलब्ध नसल्याने बुधवारपासून सुरू झाली. यात नगर परिषदेचे व पोलीस कर्मचारी अशा २५ जणांच्या ताफ्याने हा परिसर मोकळा केला. न.प. मुख्याधिकारी वाघमळे यांनी पालिकेत चार कर्मचाऱ्यांचे एक पथक अतिक्रमणावर देखरेख ठेवण्याकरिता नियुक्त केले. या पथकाद्वारे शहरातील काढलेले अतिक्रमण पुन्हा होणार नाही, याकडे लक्ष ठेवले जाणार आहे. शिवाय प्रत्येक सात दिवसांनी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी न.प. चे पाच व पोलीस विभागाचे दोन कर्मचारी असे सात लोकांचे फिरते पथक तयार केले.
९ फेबु्रवारीपासून बांधकाम विभाग, नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये बुधवारी लिलाधर निखाडे, लोहवे, चहांदे, सोमवंशी यांच्यासह न.प. कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. ही मोहीम पूढे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)
मोठ्या व्यावसायिकांच्याही हातगाड्या
शहरात ठिकठिकाणी हातगाड्यांवर फळ, भाजी व अन्य वस्तूंची विक्री करणारे गरीब व्यावसायिक असावेत, असा बहुतांश नागरिकांचा समज असतो; पण तसे नाही. प्रत्यक्षात एक वा दोन मोठ्या व्यावसायिकांच्या या हातगाड्या असल्याचे नगर अभियंता फरसोले यांनी सांगितले. बजाज चौकात फळ, भाजीविक्री करणारे भाडेतत्वावर माल व बंडी घेतात. दिवसभर विक्री करून सायंकाळी संबंधित मालकास हिशेब देतात व मजुरी घेत असल्याचे समोर आले आहे. पालिकेकडून फेरीवाल्यांना ओळखपत्र दिले जात असताना ही बाब उघड झाली. यामुळे हा प्रकार आता बंद होणार आहे. शहरातील या हातगाड्यांचे अतिक्रमण हटविल्याने गरीबांच्या व्यवसायावर गदा येते, असे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते विक्रेते खरे विक्रेतेच नसल्याचेही फरसोले यांनी सांगितले.