पोलिसांच्या नाकाखाली भरला जुगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:27 PM2018-04-27T23:27:29+5:302018-04-27T23:27:29+5:30

येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या एका पोलीस क्वार्टरमध्ये जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कार्यवाही केली. यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य चार जणांना अटक करण्यात आली. तर क्वार्टर मालकाला अटक होणे बाकी आहे.

Gambling gambling under the police naka | पोलिसांच्या नाकाखाली भरला जुगार

पोलिसांच्या नाकाखाली भरला जुगार

Next
ठळक मुद्देमुख्यालयातील क्वार्टरवर धाड : सात जणांना अटक; ५५,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या एका पोलीस क्वार्टरमध्ये जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कार्यवाही केली. यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य चार जणांना अटक करण्यात आली. तर क्वार्टर मालकाला अटक होणे बाकी आहे. या कारवाईत ४४ हजार ९२० रुपयांच्या रोख रकमेसह दोन मोबाईल असा एकूण ५५ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही शुक्रवारी करण्यात आली. पोलिसांच्या सुरक्षेत त्यांच्याच नाकाखाली भरलेल्या या जुगारामुळे दिव्याखाली अंधाराचा प्रकार वर्धेत उघड झाला.
या कारवाईत सावंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला जमादार रविंद्र डहाके, बॉम्ब निरोधक पथकाचा कर्मचारी निलेश मैदपवार व क्वार्टरचा मालक नदीम खान याच्यासह अन्य सलीम खान पठाण, आसिफ शेख महेबुब शेख, वसीम खान, शंकर शेंडे व सोनू नामक व्यक्ती अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सात जणांना अटक करण्यात आली असून नदीम खान सध्या नागपुरात आहे.
पोलीस मुख्यालय म्हणजे पोलिसांचा हृदय असे बोलले जाते. या भागात असलेली पोलिसांची गस्त आणि त्यांच्या वर्दळीमुळे येथे सर्वसामान्यांचे येणे तसे अशक्यच. याच संधीचा लाभ घेत येथील नदीम खान नामक पोलीस कर्मचाºयाचा भाऊ वसीम खान याने त्याच्या क्वार्टरमध्ये जुगार सुरू केला. हा जुगार बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याची चर्चा येथे आहे. पोलिसांच्या सुरक्षेच्या घेऱ्यात भरणाऱ्या या जुगाराची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांच्याही पायाखालची वाळू सरकली. त्यांनी लगेच वरिष्ठांना सूचना देत या क्वार्टरवर धाड घातली. येथे भर दिवसा जुगार सुरू असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी या प्रकरणी कार्यवाही करीत रोख ४४ हजार रुपये आणि मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ५५ हजार ९७० रुपये जप्त केला. या प्रकरणी शहर ठाण्यात जुगार कायद्याच्या कलमा ४,५, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. ही कारवाई शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदणे यांच्यासह त्यांच्या कर्मचाºयांनी केली.
पोलीस प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार
शहरात वा जिल्ह्यात सुरू असलेला जुगार, क्रिकेट सट्टा, अवैध दारू आदि प्रकारावर पोलिसांकडून धाडी घातल्या जात आहे. या धाडी घालताना पोलिसांच्या सुरक्षेच्या घेऱ्यात असलेल्या मुख्यालयाच्या आवारातच जुगार भरेल असा विचार कधी पोलिसांनीही केला नसावा. मात्र त्यांच्या याच सुरक्षा घेऱ्याचा लाभ घेत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या नावे रिकामे असलेल्या क्वार्टरमध्ये या कर्मचाऱ्याच्या भावानेच जुगार भरविल्याचे समोर आले.
क्वार्टरची माहिती अद्यावत नाही
जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने पोलिसांना त्यांच्या वसाहतीत क्वार्टर देण्यात येते. पण सध्या या क्वार्टरपैकी कोणते क्वार्टर खाली आहे व कोणते क्वार्टर कोणाला मिळाले याची अद्यावत माहिती पोलिसांकडे नसल्याचे समोर आले आहे. त्याची चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती प्रभारी गृह पोलीस अधीक्षक पराग पोटे यांनी दिली.
नदीम खान नागपुरात
जुगार सुरू असलेले क्वार्टर मुख्यालयाचा पोलीस कर्मचारी नदीम खान याच्या नावे आहे. तो सध्या विभागीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याकरिता नागपुरात आहे. त्याच्या गैरहजेरीत त्याच्या भावाने जुगार भरविल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

Web Title: Gambling gambling under the police naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा