गांधी-आंबेडकर यांची होणार सेवाग्राममध्ये भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:51 PM2018-01-24T23:51:58+5:302018-01-24T23:52:16+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७० व्या स्मृतीदिनानिमित्त सेवाग्राम आश्रमात ३० जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अॅड. प्रकाश आंबेडकर आणि राजमोहन गांधी यांची भेट होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७० व्या स्मृतीदिनानिमित्त सेवाग्राम आश्रमात ३० जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अॅड. प्रकाश आंबेडकर आणि राजमोहन गांधी यांची भेट होणार आहे. याप्रसंगी मान्यवर व नागरिक महात्मा गांधी यांना अभिवादन करतील.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७० व्या स्मृतीदिन कार्यक्रमानिमित्त ३० रोजी सकाळी ५.४५ वाजता घंटाघर ते बापूकुटीपर्यंत रामधून, ६ वाजता बापू कुटीसमोर प्रार्थना, ६.३० वाजता सामूहिक परिसर स्वच्छता, ९.३० वाजता संबोधन व भजन, ९.५० वाजता ‘गांधी व डॉ. आंबेडकर’ विषयावर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. गणेश देवी, राजमोहन गांधी, पद्मभूषण डॉ. चंद्रशेखर धर्माधिकारी, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, सचिव डॉ. श्रीराम जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
सायंकाळी ५.३० वाजता आश्रम प्रार्थनास्थळावर सामूहिक सुत्रयज्ञ, ६ वाजता सामूहिक प्रार्थना, रात्री ८ वाजता सर्वधर्म भजन संध्येचा कार्यक्रम आहे. आयोजित कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जयवंत मठकर, श्रीराम जाधव यांनी केले आहे.
सतत बारा तास सूत्रयज्ञ
महात्मा गांधी यांच्या ७० व्या स्मृतीदिनानिमित्त बापूकुटी परिसरात ३० जानेवारीला सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत अखंड सूत्रयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सुमारे १०० नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.