गांधी आश्रम पर्यटनस्थळ नव्हे तर जगाचे प्रेरणास्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:00 AM2021-03-13T05:00:00+5:302021-03-13T05:00:12+5:30
सेवाग्राम विकास आराखड्याची काही कामे पूर्ण तर काही अपूर्ण आहेत. राज्याचे बजेट सादर करताना वित्तमंत्र्यांनी याचा उल्लेखही केला. महाविकास आघाडीने गांधीजींच्या विचारांचा प्रचार तसेच ऐतिहासिक वास्तूंचा रखरखाव यासाठी बजेटमध्ये एक वेगळे हेड निर्माण केले. जुलै मध्ये कामासाठी पैसा उपलब्ध होईल. गांधीजींचा विचार लोकांपर्यंत न्यायचा असून सामान्यांच्या हिताचा विचारही करायचा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : अमृत महोत्सव साजरा करीत असताना अधिकारा सोबत कर्तव्याचाही भाग असला पाहिजे. वर्धा जिल्हा ही गांधीजींची कर्मभूमी राहिली आहे. त्यामुळे सेवाग्राम आश्रम पर्यटन स्थळ नव्हे तर जगासाठी प्रेरणास्थान असून ते कायम राहिले पाहिजेच, असे प्रतिपादन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
येथील गांधी आश्रमात शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे, सर्व सेवा संघांचे अशोक शरण, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री मुकुंद मस्के यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ना. केदार पुढे म्हणाले, ऐतिहासिक पद्धतीने हा दिवस साजरा करीत आहे. गांधीजींची विचारधारा सामान्य लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. सेवाग्राम विकास आराखड्याची काही कामे पूर्ण तर काही अपूर्ण आहेत. राज्याचे बजेट सादर करताना वित्तमंत्र्यांनी याचा उल्लेखही केला. महाविकास आघाडीने गांधीजींच्या विचारांचा प्रचार तसेच ऐतिहासिक वास्तूंचा रखरखाव यासाठी बजेटमध्ये एक वेगळे हेड निर्माण केले. जुलै मध्ये कामासाठी पैसा उपलब्ध होईल. गांधीजींचा विचार लोकांपर्यंत न्यायचा असून सामान्यांच्या हिताचा विचारही करायचा आहे. पुढीच्या पिढीसाठी उज्ज्वल भविष्यासाठी गांधी हा विषय लोकांपर्यंत नेला पाहिजे. कारण या देशात जी क्रांती घडली ती विचारधारेने घडली आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, अशोक शरण यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात भजनाने झाली. मुकुंद मस्के यांनी बापू का काम अभी बाकी है ही कव्वाली सादर केली. संचालन नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी केले. याप्रसंगी सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे, तहसीलदार स्वप्नील दिगलवार, शरद सुर्यवंशी, सिद्धेश्वर उंबरकर, रामेश्वर गाखरे, मिथून हरडे, विजय धुमाळे, संगीता चव्हाण, दीपाली उंबरकर, अश्विनी बघेल, रूपाली उगले, वरूडच्या सरपंच सुनीता ढवळे, उर्मीला देशमुख, पांडुरंग गोसावी आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान कोरोना विषयक जनजागृतीपर चित्ररथाला मान्यवरांनी हिरवीझेंडी दाखविली. या चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात नागरिकांनी कसे कोविडमुक्त रहावे याची माहिती दिली जाणार आहे. मान्यवरांचे स्वागत सुतमाला देऊन करण्यात आले.
सेवाग्राम हे युवकांसाठी शक्तीपीठ : रामदास तडस
साबरमती आश्रम येथे पदयात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवीझेडी दाखविली. स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मुठभर मिठ उचलून गांधीजींनी कायद्याचा विरोध केला. येथूनच स्वातंत्र्य चळवळीला सर्वाधिक बळ मिळाले. त्यामुळे सेवाग्राम हे युवकांसाठी शक्तीपीठच आहे, असे विचार खासदार रामदास तडस यांनी मांडले.
अमृतवर्ष नव्या पिढीला प्रेरणा देणारे : आंबटकर
आश्रम आणि स्वातंत्र्याचे अमृतवर्ष नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे. आपल्याला इतिहासाची एक बाजू माहित असते तर दुसरी नाही. गितांतून बापूंच्या विचारांचा संदेश आहे. या जिल्ह्यात आष्टीचा इतिहासही नवीन पिढीला ज्ञात असला पाहिजे. तरूणांनी ध्येयवाद जपावा, असे आमदार रामदास आंबटकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.