गांधी जयंतीदिनी दक्षिण आफ्रिकेतही पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:34 AM2018-10-01T09:34:47+5:302018-10-01T09:36:35+5:30
यंदा गांधीजींची १५० वी जयंती तर डॉ. नेल्सन मंडेला यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. पू. बापूंची कर्मभूमी दक्षिण आफ्रिका असल्याने गांधी -नेल्सन मंडेला समता यात्रेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत गांधी जयंतीपासून करण्यात आले आहे.
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरूवात दक्षिण आफ्रिकेतील फिनिक्स आश्रमची स्थापना करून केली. गांधीजींनी जे कार्य केले तोच वारसा डॉ. नेल्सन मंडेला यांनी पुढे चालविला. या दोन्ही महापुरूषांचे कार्य शांती, अहिंसा आणि समतेच्या मार्गाने समतेसाठी होते.
यंदा गांधीजींची १५० वी जयंती तर डॉ. नेल्सन मंडेला यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. पू. बापूंची कर्मभूमी दक्षिण आफ्रिका असल्याने गांधी -नेल्सन मंडेला समता यात्रेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत गांधी जयंतीपासून करण्यात आले आहे. या यात्रेला मंडेला गांधी शांती पदयात्रा असे नाव दिलेले आहे. ही यात्रा फिनिक्स आश्रमपासून निघून डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निवासस्थानी समारोप होईल. ही यात्रा जवळपास दोन महिने चालणार असून ११०० कि़मी.ची ही पदयात्रा राहणार आहे.
या यात्रेत सेवाग्राम आश्रमचे जालंधरनाथ चन्नोले सहभागी असून त्यांच्या सोबत योगेशभाई माथुरिया (पुणे), दिलीप तांबोळकर (पुणे), साक्षी माथुरीया (पुणे) आणि संग्राम पाटील (सातारा) याचा पण समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेतील गांधी मेमोरियल कमिटी आणि नेल्सन मंडेला जन्म शताब्दी वर्ष समिती यांच्यावतीने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे पत्र डेव्हीड गेंगण यांनी पाठविले. तसेच गांधीजींच्या नातीन ईला भट्टाचार्य यांनी पण यात्रेसाठी पुढाकार घेतल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत लोकमतशी बोलताना जालंधरनाथ म्हणाले की, महात्मा गांधीजींनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात दक्षिण आफ्रिकेमधून केली. तेथील भारतीय लोकांचा आवाज उठविण्यासाठी इंडियन ओपिनियन या पत्रिकेचे संपादन केले.
शोषणमुक्त अहिंसक, स्वावलंबन हेच स्वराज्य हे जीवन जगण्यासाठी डरबन व जोहान्सबर्ग हे मोठे शहर सोडून फिनिक्स या छोट्या गावामध्ये आश्रमची सुरूवात केली. गांधीजींची १५० वी जयंती वर्ष २०१९ ला आहे.
च्चारही पदयात्री २१ सप्टेंबर रोजी पुण्यावरून मुंबईकडे पायदळ निघाले आहे.२९ रोजी मुंबईवरून जोहान्सबर्र्गसाठी रवाना होतील. २ आॅक्टोबर रोजी फिनिक्स आश्रम (जोहान्सबर्ग) वरून पदयात्रेला प्रारंभ होईल. आणि समारोप डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निवासस्थानी २० नोव्हेंबरला होणार महात्मा गांधीजींच्या ऐतिहासिक स्थळांना पदयात्रेदरम्यान भेटी देण्यात येणार आहे. या पदयात्रेला विश्व पदयात्रेचे स्वरूप पुढे देण्यात येणार असून आफ्रिकेनंतर बांग्लादेश, जपान, अमेरिका व नेपाळ या देशात अशीच यात्रा काढण्यात येणार आहे.
संपूर्ण जगाला दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींच्या कार्याची ओळख व्हावी. त्यांचे महत्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता गांधी १५० शांती पदयात्रेची सुरूवात दक्षिण आफ्रिकेतून करण्याच ठरविले. त्यांचा वारसा डॉ. नेल्सन मंडेला यांनी पुढे नेला. मानवी हक्क व रंगेभेदावर अहिंसक मार्गाने प्रभावी आंदोलन केले. त्याचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या कार्याला स्मरण गांधी नेल्सन मंडेला समता शांती यात्रा असे या यात्रेचे स्वरूप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.