गांधी बहुआयामी, सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:13+5:30
डॉ. बैस म्हणाले, गांधीनी भारताला आधुनिक आयाम दिला. त्यांच्या विचाराने भारताला नवी गती मिळाली. त्यांच्या विचारांची कास धरल्यास भारताच्या विकासाला गती मिळेल, हेही आता हळूहळू लोकांना कळू लागले आहे. या ग्रंथाची निर्मिती एक स्तुत्य उपक्रम ठरल्याचे त्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी हे बहुआयामी आणि सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व होते, हे सर्वश्रुतच आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांचे फार मोठे योगदान लाभले आहे. संपूर्ण जगानेही त्यांचे मोठेपण स्वीकारले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती समारोप प्रसंगाचे औचित्य साधून या संपादकीय संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन होत आहे. त्यामुळे या ग्रंथाचे महत्त्व आज प्रासंगिक असल्याचे मत यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी व्यक्त केले. यशवंत महाविद्यालयात इतिहास अभ्यास मंडळाच्या उद्घाटन समारंभात डॉ. प्रकाश मसराम व डॉ. नरेश कवाडे द्वारा संपादित ‘महात्मा गांधी आणि आधुनिक भारताची निर्मिती : इतिहास आणि त्या पलिकडे’ या संदर्भग्रंथाचे प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्राचार्य डॉ. विलास देशमुख, प्राचार्य डॉ. वीरेंद्र बैस, प्रा. दिलीप देशमुख, प्रा. डॉ. प्रकाश मसराम, प्रा. डॉ. नरेश कवाडे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले, आज देशाला गांधी विचारांची आवश्यकता आहे. अशा प्रकारची ग्रंथ निर्मिती संशोधनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरू शकते.
डॉ. बैस म्हणाले, गांधीनी भारताला आधुनिक आयाम दिला. त्यांच्या विचाराने भारताला नवी गती मिळाली. त्यांच्या विचारांची कास धरल्यास भारताच्या विकासाला गती मिळेल, हेही आता हळूहळू लोकांना कळू लागले आहे. या ग्रंथाची निर्मिती एक स्तुत्य उपक्रम ठरल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय इतिहास विभाग प्रमुख डॉ. नरेश कवाडे यांनी करून दिला. प्रा. प्रितेश सोनटक्के यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता विभागातील प्रा. पौर्णिमा काकडे, प्रा. संजीवनी पाटील, प्रा. प्रियंका जाधव यांच्यासह इतिहास अभ्यास मंडळाचे सचिन सांबरे, गौरव तामगाडगे, उर्वशी सेंदरे, लक्ष्मी गायधने, संघपाल मून, सूरज तेलंगे, भारती चनेकर, विशाल जगताप, वीरेंद्र रन्नावरे, असिफा शेख, शीतल ठाकरे, स्वयमा वागदे, प्रिया काळे, प्रणव नाखले, भगवान गुजरकर आदींनी सहकार्य केले.