गांधींना त्यांच्याच पद्धतीने समजून घेण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:30 PM2018-12-27T22:30:21+5:302018-12-27T22:30:41+5:30
महात्मा गांधींनी हिंदस्वराज लिहिण्याआधी आपल्या पोराल या मित्राला पत्र लिहून १६ सूत्रांतून या पुस्तकाचे सूतोवाच केले होते. भारताच्या संस्कृतीचा शोध घेता यावा यासाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिला. युनानी, युरोप या पाश्चात्य संस्कृतीला मूल्यांचा आधार नाही म्हणून त्याचे भवितव्य अस्थिर, तर भारतीय संस्कृतीत साऱ्या प्रश्नांची उत्तरे-उपाय आपल्यात सापडतात, ती परिवर्तनशील आहे, नदीसारखी प्रवाहित आहे, संस्कृतीची परंपरा ही प्रगतीकडे जाणारी असते. परंपरासुद्धा प्रगतिशील असते, हे गांधींनी हिंदस्वराजमधून सिद्ध केले आहे. हिंदस्वराजकडे आपण गांधींच्या दृष्टीने बघणे आवश्यक ठरते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध हिंदी समीक्षक आणि अनुवादक प्रा. देवराज यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधींनी हिंदस्वराज लिहिण्याआधी आपल्या पोराल या मित्राला पत्र लिहून १६ सूत्रांतून या पुस्तकाचे सूतोवाच केले होते. भारताच्या संस्कृतीचा शोध घेता यावा यासाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिला. युनानी, युरोप या पाश्चात्य संस्कृतीला मूल्यांचा आधार नाही म्हणून त्याचे भवितव्य अस्थिर, तर भारतीय संस्कृतीत साऱ्या प्रश्नांची उत्तरे-उपाय आपल्यात सापडतात, ती परिवर्तनशील आहे, नदीसारखी प्रवाहित आहे, संस्कृतीची परंपरा ही प्रगतीकडे जाणारी असते. परंपरासुद्धा प्रगतिशील असते, हे गांधींनी हिंदस्वराजमधून सिद्ध केले आहे. हिंदस्वराजकडे आपण गांधींच्या दृष्टीने बघणे आवश्यक ठरते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध हिंदी समीक्षक आणि अनुवादक प्रा. देवराज यांनी केले.
यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्यावतीने आयोजित डॉ. भा. ल. भोळे आणि डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी पुरस्कार समितीचे निमंत्रक किशोर बेडकिहाळ, संस्थाध्यक्ष प्रदीप दाते, सदस्य डॉ. राजेंद्र मुंढे, प्रा. शेख हाशम आणि पुरस्कारप्राप्त लेखक रामदास भटकळ, प्रा. उदय रोटे आणि प्रसाद कुलकर्णी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
संसदीय व्यवस्थेचे गुणगाण केले जाते, ती गांधींची संसदीय व्यवस्था नाही. मात्र, ती स्वीकारून तडजोड करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगून प्रा. देवराज म्हणाले, संसदेने मौलिक अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे सत्ता स्वत:च्या हातात घेणे तसेच कुठला अधिकार कुठल्या सीमेपर्यंत द्यायचा, हेही व्यवस्था ठरवत असते. त्यामुळे गांधींंना ती व्यवस्था स्वीकार नव्हती, असेही ते म्हणाले.
अनेकजण म्हणतात, भाषा बारा कोसावर बदलत असते. गांधींजींनी वापरलेल्या भाषेत अनेक शब्द आढळतात. त्यामधील एक म्हणजे 'गॉड' शब्दाचा अर्थ आपल्यासाठी राम, कृष्ण, विठ्ठल, असा आहे. मात्र, गांधींजींच्या मते तो त्याचा अर्थ तसा नाही. त्यांनी रामाला देवाचा अवतार मानला नाही, तर ऐतिहासिक व्यक्तीही मानले नाही. त्यामुळे गांधी समजून घेताना त्यांच्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. गांधींना समजणे वाटते तितके सोपे निश्चितच नाही, असे मत भटकळ यांनी व्यक्त केले. प्रा. रोटे, कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने यंदाचा डॉ. भा. ल. भोळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा वैचारिक ग्रंथ लेखन पुरस्कार मुंबईचे रामदास भटकळ यांच्या 'हिंदस्वराज' या मराठी अनुवादासाठी देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार इचलकरंजीचे प्रसाद कुलकर्णी यांना तर डॉ. यशवंत सुमंत युवा संशोधक प्रेरणा पुरस्कार अंबरनाथचे प्रा. उदय रोटे यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १० हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. बेडकिहाळ यांनी पुरस्कार निवडीमागील भूमिका व लेखकांचा परिचय करून दिला. प्रा. गजानन अपीने यांनी उदय रोटे यांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. मुंढे आणि प्राचार्य रंजना दाते यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. हाशम यांनी प्रास्ताविक तर संचालन प्रा. अमोल गाढवकर यांनी केले. प्रदीप दाते यांनी आभार मानले . कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता आकाश दाते, रजत देशमुख यांनी सहकार्य केले. डॉ उल्हास जाजू, लेखक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, सतीश तांबे, कवी -समीक्षक प्रा. अभिजित देशपांडे, प्रा. अपीने यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.