वर्ध्यातील गांधी विचार परिषद होणार कायमची बंद ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 11:37 AM2020-07-18T11:37:53+5:302020-07-18T11:38:24+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांच्या नावाने असलेल्या फाऊंडेशनच्या गांधी विचार परिषद कायम लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांच्या नावाने असलेल्या फाऊंडेशनच्या गांधी विचार परिषद कायम लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या परिषदेतून देश-विदेशातील असंख्य युवकांना गांधी विचारांचे धडे दिले जातात. पण, गेल्या काही महिन्यांपासून कामकाज ठप्प आहे. तसेच तेथील कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा हालचाली सुरू झाल्याची चर्चा दूरवर पोहोचली आहे.
देशातच नव्हे, तर देशाबाहेरही गांधीजींचे जीवन व त्यांचे विचार यावर अध्ययन आणि संशोधन करण्यासंदर्भात गांधी विचार परिषदेची वेगळी ओळख आहे. येथे भारतासह विविध देशातील विद्यार्थी अध्ययनाकरिता येतात. येथून बाहेर पडणारा विद्यार्थी हा गुणवत्तापूर्ण ठरतो. पण, सध्या या विचार परिषदेला ग्रहण लागल्याचे बोलले जात आहे. विचार परिषद बंद होणार असल्याची माहिती मिळताच येथील माजी विद्यार्थ्यांसह गांधी विचारकांनी या संस्थेसंदर्भातील भूत-भविष्यकाळ आणि वर्तमानावर मंथन सुरू केले आहे. मात्र, अद्याप या संस्थेने बंद करण्यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नसली तरीही गांधी विचारांचा प्रसार करणारी ही संस्था बंद न करता आणखी चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी विद्यार्थ्यांसह समर्थक जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या विश्वस्तांना पत्र आणि ई-मेलद्वारे करीत असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली नाही तर सत्याग्रह करण्याचाही विचार करीत आहेत.
१ जुलैपासून नव्या सत्राला सुरुवात होते पण; यावर्षी कोरोना प्रकोपामुळे सुरुवात करता आली नाही. संस्थाच बंद असल्याने काम ठप्प पडले आहे. पण, कोरोना संकटकाळानंतर पुन्हा सुरुवात होईल. गांधी विचार परिषद बंद होणार ही काहींकडून जाणीवपूर्वक पसरविलेली अफवा आहे.
भरत महोदय,
संचालक, गांधी विचार परिषद, वर्धा
विचार परिषदेची वैशिष्ट्ये
गांधी विचार परिषदेतील अभ्यासक्रम आणि दिनचर्या आगवेगळी आहे. येथे परीक्षा घेतली जात नाही तर विद्यार्थ्यांना गांधीजींचे तत्त्व दर्शन, विचार, जीवन व संदेशाच्या अध्ययनासह गांधीजींच्या दिनचर्येसोबत जगावे लागते. दररोज सकाळ-सायंकाळी सर्वधर्म प्रार्थना, चरखा चालविणे, श्रमदान, स्वयंपाक घरातील कर्मचाऱ्यांना मदत करणे, परिसर स्वच्छता यासोबतच अध्ययन सत्रात सामूहिक चिंतन करणे आदी कामे करावी लागतात. येथे स्वाध्यायाला महत्त्व दिले जाते. शिक्षक म्हणून देशातील समाजसेवक, गांधीवादी, चिंतक, लेखक, कलाकार, पर्यावरणवादी आदींना निमंत्रित केले जाते. गांधी विचार परिषद कायम राहावी, यासाठी धडपडही सुरू झाली आहे.