सेवाग्राममध्ये २८ पासून गांधी विज्ञान संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:41 PM2019-02-27T13:41:50+5:302019-02-27T13:43:12+5:30
गांधी विज्ञान संमेलनाचे २८ फेब्रुवारीपासून २ मार्चपर्यंत सेवाग्राम येथील नयी तालीम परिसरात आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, त्यांनी केलेल्या वैज्ञानिक प्रयोगांचा व त्यांच्या समकालीन औचित्याचा वेध घेण्याच्या अनुषंगाने जनसहयोग ट्रस्टच्या माध्यमातून गांधी विज्ञान संमेलनाचे २८ फेब्रुवारीपासून २ मार्चपर्यंत सेवाग्राम येथील नयी तालीम परिसरात आयोजन करण्यात आले आहे.
तीनदिवसीय या संमेलनाकरिता महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील २०० पेक्षा अधिक प्रतिनिधी एकत्रित येणार आहेत.
संमेलनाचे उद्घाटन २८ ला सकाळी १०.३० वाजता वैज्ञानिकता आणि गांधीजी या विषयाने डॉ. अनिल सद्गोपाल करणार आहेत. डॉ. अभय बंग यांचे बीजभाषण होईल. अध्यक्षस्थानी जी. जी. पारिख असणार आहेत. तत्पूवीर १० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. गुप्ता यांच्या हस्ते होईल. दुपारच्या सत्रात रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, सोपान जोशी, अतुल देऊळगावकर, आनंद माझगावकर, प्रदीप शर्मा विषयांची मांडणी करणार आहेत. १ मार्चला अशोक बनग, निरंजना मारू, अजय चांडक, डॉ. सतीश गोगुलवार, सुषमा शर्मा, सोहम पंड्या, करुणा फुटाणे, योगेश कुलकर्णी, श्रीकांत नावरेकर, विजय दिवाण विचार मांडतील. अध्यक्षस्थानी धरामित्रचे डॉ. तारक काटे राहणार आहेत. यानंतर गटचर्चा, एकत्रित चर्चा होणार आहे. २ मार्चला युवा वैज्ञानिकांची मांडणी, उद्याचे प्रश्न व गांधी विज्ञानाच्या संभाव्यता याविषयावर चर्चासत्र होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. मिलिंद वाटवे असतील. गांधी विज्ञानाच्या प्रकाशात, शाश्वत विकासाच्या दिशेने या विषयाची मांडणी मेधा पाटकर करणार असून यानंतर संमेलनाचा समारोप होणार आहे.