गांधी, विनोबांच्या गो-सेवा चळवळीला ७९ वर्षे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:00 PM2018-08-19T22:00:33+5:302018-08-19T22:01:29+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी व विनोबा भावे, जमनालाल बजाज यांनी वर्धा जिल्ह्यातून गो सेवा चळवळीची सुरूवात केली. महात्मा गांधी यांनी प्रथम वर्धा व जयपूर येथे अखिल भारतीय गो सेवा संघ सन १९३९ मध्ये स्थापन करून संस्थेच्या कामकाजास प्रारंभ केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी व विनोबा भावे, जमनालाल बजाज यांनी वर्धा जिल्ह्यातून गो सेवा चळवळीची सुरूवात केली. महात्मा गांधी यांनी प्रथम वर्धा व जयपूर येथे अखिल भारतीय गो सेवा संघ सन १९३९ मध्ये स्थापन करून संस्थेच्या कामकाजास प्रारंभ केला. या ऐतिहासीक घटनेला यंदा ७९ वर्षे पूर्ण झाले आहे. गांधीनी वर्ध्यांत सुरू केलेली ही चळवळ गोरस भंडारच्या रूपाने वटवृक्षात रूपांतरीत झाली आहे.
१९३६ मध्ये या चळवळीला गांधीनी सुरूवात केल्यानंतर संपूर्ण जबाबदारी जमनालाल बजाज यांच्यावर सोपविली. जमनालालजींनी साथीक व्यवस्थापक म्हणून देशपांडे यांना संस्थेचे कामकाज पाहण्याची संधी दिली. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या पुढाकाराने या संस्थेचे रूपांतर सहकारात करून सन १९६१ मध्ये वर्धा तहसील गो. दुध उत्पादक सह. संघ गोरस भंडार या संघाची स्थापना केली.
ही संस्था दुध उत्पादन व विक्री सेवा ग्राहकापर्यंत पोहचविण्याचे काम करू लागली. शुद्ध दुधाचा ताजा पुरवठा व दुधापासून तयार केलेले उत्पादीत पदार्थ पेढा, बासुंदी, श्रीखंड, पनीर, गोरसपाक, ब्रेड आदी पुरवठा करण्यात येते आहे. गोरस भंडार या संघाची स्थापना करून संघाचे पहिले अध्यक्ष अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांना मान दिला. व संघाच्या कामाजास प्रत्यक्षात सुरूवात करून वर्धा तालुक्यामध्ये साटोडा, आंजी, बरबडी, सालोड, सज्जनवाडी, आलोडी या गावात संस्था स्थापन करून कामकाजात प्रारंभ केला. ‘इवलंस बीज त्याचा वेलू गेला गगणावरी’ या उक्ती नुसार महात्माजींनी सुरू केलेल्या या चळवळी चे (संघाचे) काम आज वर्धा तालुक्यातील नागपूर, बरबडी, सालोड, पिपरी, सेलुकाटे, आलोडी, श्रिसगाव, आजगाव, महाकाळ, पांढरकवडा, नांदोरा, नागठाणा, येरणगाव, आष्टा, साटोडा या गावापर्यंत पोहचले.या गावात संस्था स्थापन करून एक हजार दुध उत्पादकांकडून दैनिक तब्बल १३ हजार लिटर दुध संकलित करण्यात येते. या संघाला कोणतेही शासकीय अनुदान न मिळता संस्थेचे संपूर्ण कार्य स्वबळावर ‘ना नफा ना तोटा’ या पद्धतीवर चालविले जाते. गोरस भंडारचे वर्धा शहरामध्ये १२ अधिकृत केंद्र असून त्या केंद्रामधूनच दूध व दुग्धजन्य पदार्थ लोकांपर्यंत पोहचविले जातात. संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा आजवर अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, भैय्यासाहेब मशानकर, दादाजी कासटवार, विठोबा शेंडे, वसंत पाटील, देवराव कासटवार यांनी सांभाळली. १०० कर्मचारी या संघात काम करीत आहे.
संघामध्ये नवीन स्वयंचलित यंत्राची भर पडल्यामुळे कर्मचाऱ्याच्या कामाचा काहीसा ताण कमी होवून त्यामुळे दूधजन्य पदार्थ जास्तीत जास्त उत्पादीत होवून ग्राहकाची मागणी पूर्ण करता येईल.
- माधवराव कडू, व्यवस्थापक, गोरस भंडार, वर्धा
नवीन यंत्रसामग्री दाखल
सध्या दूध उत्पादनाची वाढती मागणी लक्षात घेऊन उत्पादन वाढविण्याकरिता संघामध्ये या वर्षी नवीन स्वयंचलीत यंत्र खरेदी केले होते. त्यात पेढा मशीन, आटा मिश्रण मशीन, बटर चर्णर आदी मशीन संस्थेने खरेदी केल्या आहेत. त्यामुळे पेढा, लोणी, गोरसपाक, श्रीखंड या पदार्थाच्या गुणवत्ता वाढणार आहे.
वर्धा शहरातील ग्राहकाची संख्या लक्षात घेता संपूर्ण शहरामध्ये गोरस भंडारचे शुद्ध व दुध व ताजे दुधजन्य पदार्थ पोहचेल यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- देवराव कासटवार, अध्यक्ष, गोरस भंडार, वर्धा