गांधीवादी संस्था लढवय्यांचे किल्ले झाल्या पाहिजेत
By admin | Published: December 27, 2014 02:16 AM2014-12-27T02:16:12+5:302014-12-27T02:16:12+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही धर्मांध, प्रतिगाम्यांची संघटना असून असत्याची मांडणी करणे, हा त्यांच्या तंत्राचा भाग आहे, ...
वर्धा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही धर्मांध, प्रतिगाम्यांची संघटना असून असत्याची मांडणी करणे, हा त्यांच्या तंत्राचा भाग आहे, अशी नोंद ६० वर्षापूर्वीच आचार्य विनोबा भावे यांनी केली आहे़ आज देशात उद्यमांची सत्ता आली आहे़ अशावेळी, गांधीवादी संस्था केवळ चष्मा आणि चपलाजोडेच सांभाळणार की गांधीविचारही समाजात पोचविणार, असा परखड सवाल उपस्थित करीत गांधीवादी संस्था आता लढवय्यांचे किल्ले झाल्या पाहिजेत, असे आवाहन चरित्रकार आणि सर्वोदयी कार्यकर्ते विजय दिवाण यांनी केले.
यशवंतराव दाते स्मृती संस्था आणि भोळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक बजाज सार्वोजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या समारोहात रायगड जिल्ह्यातील विजय दिवाण यांना ‘आचार्य विनोबा भावे’ या चरित्रगं्रथासाठी डॉ़ भा़ल़ भोळे स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कार देण्यात आला़, तर पुणे येथील प्रगतीशील भारतीय मुस्लीम आंदोलनातील कार्यकर्ते अन्वर राजन यांना डॉ़ भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला.
अध्यक्षस्थानी पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ़ यशवंत सुमंत तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा़ डॉ़ चित्तरंजन मिश्र, विजया भोळे, संस्थाध्यक्ष प्रदीप दाते, उपाध्यक्ष प्रा़ शेख हाशम उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा़ शेख हाशम यांनी केले़ मानपत्रांचे वाचन प्रा़ राजेंद्र मुंढे यांनी केले़ संचालन संजय इंगळे तिगावकर यांनी केले. आभार प्रदीप दाते यांनी मानले़ यशस्वीतेसाठी रंजना दाते, हिरण्मय भोळे, प्रा़ पद्माकर बावीस्कर, प्रशांत पनवेलकर, डॉ़ स्मिता वानखेडे, आकाश दाते आदींनी सहकार्य केले़(शहर प्रतिनिधी)