गांधीविरोधकांसाठी ‘गांधीविचार’ हाच प्रतिवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 09:06 PM2019-01-02T21:06:59+5:302019-01-02T21:07:46+5:30

गांधी अजूनही मरत नाही म्हणून त्याला रोज मारलं जातेय. त्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. वेगवेगळे खांदे वापरून चारित्र्यहनन केले जाते. तरीही गांधी मरत नाही. कारण महात्मा गांधींचे चाहते सर्व जातीधर्मात, संप्रदायात, सर्व प्रांतांत आणि देश-विदेशात आहे.

'Gandhian thought' is the only defense for Gandhi | गांधीविरोधकांसाठी ‘गांधीविचार’ हाच प्रतिवाद

गांधीविरोधकांसाठी ‘गांधीविचार’ हाच प्रतिवाद

Next
ठळक मुद्देअन्वर राजन : ‘सांप्रदायिक सद्भावना आणि महात्मा गांधी’ विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गांधी अजूनही मरत नाही म्हणून त्याला रोज मारलं जातेय. त्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. वेगवेगळे खांदे वापरून चारित्र्यहनन केले जाते. तरीही गांधी मरत नाही. कारण महात्मा गांधींचे चाहते सर्व जातीधर्मात, संप्रदायात, सर्व प्रांतांत आणि देश-विदेशात आहे. या देशात सांप्रदायिक सदभावना रुजवायची असेल तर गांधींबद्दल जी विषारी भाषा आज वापरली जाते, त्याचा गांधीविचारांनीच प्रतिवाद केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी अन्वर राजन यांनी केले.
गांधी फॉर फ्युचर आणि सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मासिक व्याख्यानमालेच्या या व्दितीय पुष्पात अन्वर राजन यांनी ‘सांप्रदायिक सदभावना आणि महात्मा गांधी’ या विषयाची मांडणी केली. वर्तमानातील घटनांचे संदर्भ देत अन्वर राजन यांनी गांधींच्या जीवनातील अनेक बाबींना सोदाहरण उजाळा दिला. तसेच धर्म व संप्रदायिकता या भिन्न बाबी असून या देशाची सामाजिक, सांस्कृतिक तसेच सांप्रदायिक जडणघडण कशी झाली, याची अभ्यासपूर्ण मांडणी केली. गांधी धार्मिक होते; पण त्यांच्या कोणत्याही आश्रमात कोणत्याही देवाचे अथवा धर्माचे मंदिर नाही. हरिजनांनाही मंदिराचे दरवाजे खुले असावेत असे म्हणणारे गांधी कधी कुठल्या मंदिरात गेले नाही. त्यांच्या आश्रमात सकाळ संध्याकाळ होणारी प्रार्थना सर्वधर्म समभाव रुजवते. सर्वच धर्म ईश्वरनिर्मित आहे; पण मानव कल्पित आहे, असे म्हणणारे गांधी ईश्वराचा कोणताही धर्म नसतो, हेही आवर्जून सांगत. धर्मांतर करणे गरजेचे नाही, ही भूमिका घेताना गांधी सर्व धर्मातील चांगला भाग स्विकारा हे सांगतात. धर्मातील कालबाह्य गोष्टी अप्रत्यक्षपणे नाकारतात. कृषी प्रधान संस्कृती जोपासताना गोरक्षा व गोसंवर्धनासाठी पुढाकार घेणारे महात्मा गांधी गोहत्या कायद्याच्या मात्र विरोधात असतात. गाय मेली तरी चालेल, पण माणूस मरता कामा नये, अशी भूमिका घेणारे गांधी. म्हणूनच आजही कट्टरवाद्यांना रुचत नाहीत.
सोशल मीडियावरून गांधींबाबत हा कसला आमचा राष्ट्रपिता, हा तर पाकिस्तानचा राष्ट्रपिता आहे, अशी टीका करीत आजही गांधींना मारले जाते. गांधींना बदनाम करण्यासाठी कधी कस्तुरबा, हरिलाल तर कधी आंबेडकर, भगतसिंह, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा खांदा वापरला जातो. वस्तुत: ज्यावेळी बाबासाहेब दलितांमध्ये जागृती निर्माण करीत होते, त्याचवेळी गांधी दलितांना आपल्यात सामावून घ्या हे सांगत सवर्णांचे मतपरिवर्तन करण्यासाठी झटत होते. गांधी खिलाफत चळवळीत सहभागी झाले होते, यावर आजही टीका केली जाते. मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात गांधींनी त्यावेळी घेतलेली भूमिका ही रास्तच होती. गांधींनी तर ख्रिश्चनांचा किंवा ब्रिटिशांचाही कधी राग केला नाही. मात्र आज विघटनाची प्रक्रिया नव्याने सुरु झाली आहे, असे राजन यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी प्रा. किशोर वानखडे यांच्या हस्ते अन्वर राजन यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रितेश घोगरे यांनी केले. संचालन प्रा. सुचिता ठाकरे यांनी केले तर आभार आकाश जयस्वाल यांनी मानले.

Web Title: 'Gandhian thought' is the only defense for Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.