गांधी स्मारक ट्रस्टला देशभरातील गांधीवाद्यांचा कडवा विरोध, साबरमती आश्रमात यात्रेचा समारोप, सरकारविरोधातील एकजूट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 08:45 AM2021-10-25T08:45:15+5:302021-10-25T08:46:39+5:30
Sabarmati Ashram : साबरमती आश्रम हे देशासाठी श्रद्धा व प्रेरणास्थान आहे. याच ठिकाणी राहून गांधीजींनी आपल्या कार्याला सुरुवात केली होती. ही राष्ट्रीय धरोवर आणि इतिहास पुसून काढण्याचे काम केंद्र सरकारच्या १ हजार २०० कोटी निधीच्या माध्यमातून होणार आहे.
सेवाग्राम (जि. वर्धा) : सेवाग्राम ते साबरमती आश्रम या संदेशयात्रेचा रविवारी गुजरात विद्यापीठात सभा घेऊन समारोप करण्यात आला. संकल्प आणि साबरमती आश्रमातील गांधीजींच्या हृदयकुंज निवासस्थानासमोर सर्वधर्मप्रार्थनेने सांगता करण्यात आली. यात गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली साबरमती आश्रम स्मारक ट्रस्टच्या कार्याला विरोध दर्शवून देशभर केंद्र व गुजरात सरकारच्या आश्रमातील हस्तक्षेपाला आणि विकास योजनांना विरोध करण्याचा निर्णय देशभरातील गांधीवादी नेते, कार्यकर्त्यांनी समारोपप्रसंगी जाहीर केला.
साबरमती आश्रम हे देशासाठी श्रद्धा व प्रेरणास्थान आहे. याच ठिकाणी राहून गांधीजींनी आपल्या कार्याला सुरुवात केली होती. ही राष्ट्रीय धरोवर आणि इतिहास पुसून काढण्याचे काम केंद्र सरकारच्या १ हजार २०० कोटी निधीच्या माध्यमातून होणार आहे. याच परिसरात आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याने पर्यटनाचा विचार अधिक असल्याने गांधी विचारांनाच धक्का लावण्याचे काम होणार याची पूर्ण शाश्वती गांधीवाद्यांना असल्याने लोकांमध्ये याची माहिती पोहोेचावी, या उद्देशाने सेवाग्राम आश्रमातून १७ ऑक्टोबर रोजी संदेशयात्रा रवाना झाली होती.
महाराष्ट्रातील तसेच गुजरात राज्यात ठिकठिकाणी सभा तसेच लोकांशी संवाद साधून यात्रेचा उद्देश समजावून सांगितला.
सरकारला सद्बुद्धी प्राप्त होवो. सरकारच्या योजनेला जनमानसातून विरोध झाला पाहिजे, अशीच भावना सहभागी तसेच संवादातून दिसून आलेली आहे. यात्रेचा समारोप झाला असला तरी केंद्र व गुजरात सरकारचा विरोध गांधीवादी देशभर करतील, असे यात्रा संयोजक दिल्लीचे संजय सिंह यांनी पत्रकातून कळविले आहे. १४ राज्यांतील कुमार प्रशांत, प्रकाश शाह, उत्तम परमार, रामचंद्र राही, राजेंद्रसिंह राणा, आशा बोथ्रा, चंदन पाल, सवाई सिंह, डॉ. बिस्वजित, अशोक भारत, शैख हुसैन, अरविंद कुशवाह, टी.आर.एन. प्रभू, डॉ. सुगन बरंठ, पी.व्ही. राजगोपाल, अजमत उल्ला खान, चिन्मय मिश्रा, मनोज ठाकरे, भूपेश धीरण, राम धीरण यासह अहमदाबाद येथील सहयोगी सहभागी होते.