बेमुदत कामबंद आंदोलनातील तहसीलदार-नायब तहसीलदारांची 'गांधीगिरी'
By महेश सायखेडे | Published: April 3, 2023 06:18 PM2023-04-03T18:18:48+5:302023-04-03T18:20:19+5:30
'ग्रेड-पे'च्या मागणीसाठी गांधी पुतळ्या समोर दिले धरणे
वर्धा : तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी 'ग्रेड-पे'च्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन ३ एप्रिलपासून सुरू केले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या नेतृत्त्वात स्थानिक गांधी पुतळा परिसरात एकत्र आलेल्या तहसीलदार व नायब तहसीलदारांनी धरणे दिले. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल मंत्र्यांना पाठविण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार, राजपत्रित वर्ग-२ हे महत्त्वाचे पद आहे. पण नायब तहसीलदार पदाचे वेतन राजपत्रित वर्ग-२ चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने नायब तहसीलदार यांचे ग्रेड-पे वाढविण्याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. पण संघटनेच्या मागणीला केराची टोपली दाखविली जात असल्याने समस्या अजूनही कायम आहे. नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-२ यांचे ग्रेड-पे ४ हजार ८०० रुपये करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
आंदोलनात वर्धेचे तहसीलदार रमेश कोळपे, आर्वीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण, कारंजाच्या तहसीलदार एश्वर्या गिरी, आष्टीचे तहसीलदार सचिन कुमावत, समुद्रपूरचे तहसीलदार कपील हटकर, देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे, हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मासाळ, सेलूचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार अतुल रासपायले आदी सहभागी झाले होते.
तालुका कचेरीतील कामकाज प्रभावित
तहसीलदार व नायब तहसीलदारांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील आठही तालुकाकचेरीतील कामकाज सोमवारी प्रभावित झाले होते. तहसीलदार आणि नायब तहसीलदार बेमुदत कामबंद आंदोलनामुळे त्यांच्या दालनात नसल्याने विविध कामानिमित्त तहसील कार्यालयांत आलेल्यांना आल्या पावली परत जावे लागले.