उकिरडा हटविण्यासाठी गावकऱ्यांनी केली गांधीगिरी; वर्धा जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:05 PM2018-10-30T12:05:36+5:302018-10-30T12:06:13+5:30
घरासमोर असलेला उकिरडा कसा हटवावा व नागरिकांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याची सवय कशी लावावी या विवंचनेत असलेल्या काही तरुणांनी चक्क गांधीगिरी करत उकिरड्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवून टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: घरासमोर असलेला उकिरडा कसा हटवावा व नागरिकांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याची सवय कशी लावावी या विवंचनेत असलेल्या काही तरुणांनी चक्क गांधीगिरी करत उकिरड्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवून टाकला. वर्धा जिल्ह्यातल्या पढेगाव या गावात घडलेल्या घटनेची परिसरात सर्वत्र चर्चा असून या तरुणांच्या कल्पकतेचे कौतुक केले जात आहे.
जिल्ह्यातील पढेगाव येथे मुख्य रस्त्याच्या कडेला सिंगल फेस डीपी आहे. या डिपीच्या खाली जवळपासचे नागरिक दररोज कचरा टाकत होते. त्यांना वारंवार विनंती करूनही काहीच परिणाम होत नव्हता.
अखेरीस गजानन परचाके, प्रशांत चक्रधरे, निलेश कोहाड, श्रीधर मांढरे आदी तरुणांनी या डीपीखालचा कचरा श्रमदानाने साफ करून टाकला. त्या जागी शेंदूर लावलेल्या एका शिळेची स्थापना करून दिली व आजुबाजूला मोठी रांगोळीही काढली. तो भाग त्यांनी इतका स्वच्छ केला की, आता त्यावर कोणालाही लहानसाही कचरा टाकण्यास संकोच व्हावा. त्यांच्या या कृतीने डीपीखाली साठणारा कचरा तर थांबलाच पण नागरिकांनाही एक दिशा मिळाली.