आश्रमातून गांधीजींनी देशाला रचनात्मक कार्यक्रम दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:32 PM2017-12-24T23:32:30+5:302017-12-24T23:32:41+5:30
महात्मा गांधींनी जगाला सत्याग्रहाचे नवे शस्त्र दिले. शांती व अहिंसेवरून लोकांचा विश्वास उडाला होता; पण दांडीमार्चद्वारे गांधींची ताकद शांती, अहिंसा व सत्याग्रहातून दिसून आली. स्वातंत्र्य चळवळीसाठी देशाला नवा नेता मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : महात्मा गांधींनी जगाला सत्याग्रहाचे नवे शस्त्र दिले. शांती व अहिंसेवरून लोकांचा विश्वास उडाला होता; पण दांडीमार्चद्वारे गांधींची ताकद शांती, अहिंसा व सत्याग्रहातून दिसून आली. स्वातंत्र्य चळवळीसाठी देशाला नवा नेता मिळाला. सत्याग्रहाची चळवळ शांती, अहिंसेच्या माध्यमातून अधिक प्रभावशाली झाल्याने देशातील लोकच नव्हे तर जगातील अभ्यासकांवर त्याचा प्रभाव झाला. स्वातंत्र्य आंदोलनासह याच आश्रमातून रचनात्मक कार्यक्रम देशासमोर ठेवले, असे मत प्रा. रामचंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. यात देशातील १६ राज्यातील तथा नेपाळ व अफगानिस्थानचे विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, गांधी विचार परिषदेचे संचालक भरत महोदय उपस्थित होते.
प्रा. प्रधान पूढे म्हणाले की, गांधीजींनी इतिहास निर्माण केला. कदाचित इतिहास मिटू शकेल; पण बापूंनी अध्यात्म व संसार यांना जोडले. याच समाजात राहून तुम्ही अध्यात्मिक जीवन जगू शकता. समाज परिवर्तन करू शकता. ट्रस्टीशीपवर भर दिला. अन्यथा अंबानी व अदानीसारखे लोक तयार होतील. समाज व्यवस्था, परिवर्तन व रचनात्मक कार्य, ही महत्त्वपूर्ण दिशा गांधीजींनी देशाला, जगाला दिल्याचे सांगून गांधीजींबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी पसरविण्यात येत आहे. यात डॉ. आंबेडकर, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, पाकीस्तान निर्मिती यावर प्रकाश टाकून चुकीचा प्रचार खोडून काढला.
भरत महोदय यांनी इतिहासाचे वाचन करून समजून घ्या. कुणी सांगितले, त्यावर विश्वास ठेवू नका. स्वयंअध्ययनातून ज्ञान वाढविण्याचे आवाहन केले. जयवंत मठकर यांनी आश्रमच्यावतीने सर्वांचे स्वागत करून सर्वधर्म प्रार्थना केली. महाराष्ट्र, गुजरात, मणीपूर, बिहार, तेलंगना, आंध्रप्रदेश, दिल्ली, पाँडेचेरी, ओडीसा, हरीयाणा, केरळ, तामिळनाडू, त्रिपूरा, कर्नाटक, राजस्थान, बंगाल आदी राज्यांतील तथा नेपाळ, अफगानिस्थान येथील ६१ मुली व महिला यात सहभागी होत्या. हे सर्व जन गांधी विचार परिषदेच्या शिबिराला आले आहे. याप्रसंगी प्रा. सी. ज्योत्सना सुरेंद्र कुमार, प्रवीण सातवकर उपस्थित होते.
या ठिकाणी खरोखर शांती व सदाचार दिसून आला. मी हरियाणाचा असल्याने गांधीजींच्या विचारावर हरियाणांच्या लोकांनी विचार करावा. या ठिकाणी नक्कीच त्यांनी यावे.
- सचिन कुमार व अंकित राणा, हरियाणा.
आश्रमचा व गांधीजींचा इतिहास जाणून घेतला.
- कल्पेश कोठावदे, महाराष्ट्र.
आम्हाला या देशाचे नागरिकच समजत नाही, याचे दु:ख आहे. गांधीजी राष्ट्रपिता असून आम्ही त्यांचा सन्मान करतो. त्यांचे विचार महत्त्वपूर्ण आहेतच.
- व्हिक्टोरिया, मणीपूर.