गांधीजींनी महिलांना नेतृत्वाची संधी दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:25 PM2018-02-24T22:25:16+5:302018-02-24T22:25:16+5:30
सर्वोदय आणि गांधी संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधीत्व वाढले पाहिजे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे संधी मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे.
ऑनलाईन लोकमत
सेवाग्राम : सर्वोदय आणि गांधी संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधीत्व वाढले पाहिजे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे संधी मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे. आपण सतत गांधीजींच्या विचार व कार्यावर बोलतो; पण गांधीजींनी महिलांना पुढे करून नेतृत्व करण्याची संधी दिल्याने स्वातंत्र्य आंदोलनाला वेगळीच दिशा व धार मिळाली. यामुळे महिला, युवतींना स्थान व संधी दिली पाहिजे, असे मत शोभा शिराढोणकर यांनी व्यक्त केले.
सेवाग्राम आश्रम परिसरात गांधीजींच्या १५० व्या जयंती अभियानांतर्गत ४७ वे अखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलन सुरू आहे. यात शनिवारी सकाळी ‘स्त्री व युवा शक्ती, समस्या व समाधान’ यावर चर्चासत्र पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या.
आशा यांनी गांधी विचार पूढे न्यायचा असेल तर याची सुरुवात स्वत:पासून करावी लागेल. तरच जग बदलेल. उत्तराखंडात विकासाच्या नावावर आमच्या गावात आमचे सरकार याची प्रकर्षाने गरज आहे. ओरियाचे मधुसूदन म्हणाले की, चांगली कविता, पोवाडे शिकून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद वाढविण्यासाठी उपयोगी पडेल. आपण राष्ट्रवादांची चर्चा करतो; पण शेजाºयांशी आपली वागणूक व संबंध कसे आहेत यावर विचार, कृती करण्याची गरज आहे. उषा संतकन्या म्हणाल्या की, आपण ध्येय बाळगून पूढे गेलो पाहिजे. ‘माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी’ हे घोषवाक्य मनात बाळगावे, असे सांगितले.
सारंग रघाटाटे म्हणाले की, आजच्या परिस्थितीत प्रत्येकाच्या हातात मोबाईल नसून प्रत्येक मोबाईलच्या हातात माणूस आहे. अदिती पटनायक यांनी भारत युवकांचा देश आहे. लोकसंख्येचे रूपांतर शक्तीमध्ये व्हावे. युवक, युवतींना कागदी शिक्षणापेक्षा रोजगाराभिमूख शिक्षण मिळावे. गांधीजींचे तत्वज्ञान जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगात आणावे, असे सांगितले. नयनताराचे बसंत पांडे यांनीही चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदविला.
१५० कार्यक्रम
त्रिपुरामध्ये गांधी १५० अभियान अंतर्गत १५० कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. गांधी विचारांचा प्रसार व प्रचार करण्यात येणार आहे. तेथील लोकांना विकास काय आहे, हे माहिती नाही. इतका तो भाग मागास आहे, असे त्रिपुराचे देवाशिष यांनी सांगितले.