गांधीजींची विचारसरणी आजही प्रासंगिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 05:00 AM2020-10-10T05:00:00+5:302020-10-10T05:00:02+5:30

महात्मा गांधी यांची १५१ व्या जयंती निमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या गालिब सभागृहात 'विश्व सभ्यतेसाठी महात्मा गांधी यांची प्रासंगिकता' या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी केदार यांच्या हस्ते एकविसाव्या शतकातील आचार्य विनोबा भावेंची प्रासंगिकता या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

Gandhiji's ideology is still relevant today | गांधीजींची विचारसरणी आजही प्रासंगिक

गांधीजींची विचारसरणी आजही प्रासंगिक

Next
ठळक मुद्देसुनील केदार : सात देशांतील विचारवंतांनी मांडले विचार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधींचे विचार २१ व्या शतकातही प्रासंगिक आहे. गांधीजींच्या विचारातील साधेपणा, मानवता आणि अहिंसा संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याची गरज आहे. गांधी हा एक विचार आहे आणि केवळ गांधीजींच्या विचारांनीच मानवी आयुष्यात आणि समाजात बदल घडवून येऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
महात्मा गांधी यांची १५१ व्या जयंती निमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या गालिब सभागृहात 'विश्व सभ्यतेसाठी महात्मा गांधी यांची प्रासंगिकता' या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी केदार यांच्या हस्ते एकविसाव्या शतकातील आचार्य विनोबा भावेंची प्रासंगिकता या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल होते. अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, प्र.कुलगुरू प्रा. चंद्र्रकांत रागीट, प्रा.हनुमान प्रसाद शुक्ल, जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री उपस्थित होते. लंडन, दक्षिण आफ्रिका, उझबेकिस्तान, मॉरिशस, नेपाळ आणि लिथुआनियासारख्या देशांच्या अभ्यासकांनी वेबिनारमध्ये विचार मांडले.
इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्लीचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी बीजभाषण देताना १५० वर्षांनंतरही संपूर्ण जग गांधींच्या विचारांनी प्रेरित असल्याचे सांगितले. गांधीजी त्यांचे काम आणि विचारांनी अजूनही प्रासंगिक आहेत. गांधी विचारच सध्याच्या आव्हानांना सकारात्मक आणि समाधानकारक असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून लंडनचे गांधीवादी विचारवंत, पद्मभूषण प्रा. भिखू पारेख यांनी जागतिक सभ्यतेसाठी गांधीजींच्या मूल्यांचे अनुसरण करण्याची आजच्या समाजाची गरज असल्याचे सांगितले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी वर्धा येथे गांधीजींच्या १४ वर्षांच्या कार्यकाळावर आधारित भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेच्या सहकार्याने प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
कुलगुरू प्रा. शुक्ल यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना विद्यापीठाने प्रकाशित केलेली पुस्तके भेट दिलीत.
गांधी पीस फाउंडेशन, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. पी व्ही. राजगोपाल म्हणाले की, तरुणांमध्ये अहिंसेची, गांधींची विचारसरणी रुजविण्याच्या दिशेने कार्य करण्याची गरज आहे. शैक्षणिक संस्थांना गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वांचा उपयोग प्रत्येक कामात कसा करायचा याचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.
या कार्यक्रमाचे संचालन मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातील असोसिएट प्रोफेसर डॉ नमिता निंबाळकर आणि दूरस्थ शिक्षण संचालनालयाचे सहाय्यक प्रा. डॉ शंभू जोशी यांनी केले. आभार विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. चंद्रकांत रागीट यांनी केले. कार्यक्रमाचे सहसंयोजन डायस्पोरा विभागाचे सहायक प्रा. डॉ मुन्नालाल गुप्ता व तत्वज्ञान व संस्कृतीचे विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. सूर्यप्रकाश पांडे यांनी केले. कार्यक्रमात देश-विदेशातील विद्वान, शिक्षक आणि संशोधकांनी आॅनलाइन सहभाग घेतला.व महात्मा गांधीवर विचार मांडले.

Web Title: Gandhiji's ideology is still relevant today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.