ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांच्या समग्र माहितीसाठी ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:47 PM2018-01-05T13:47:58+5:302018-01-05T13:50:09+5:30
गांधींजींनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कृतीशील अर्थशास्त्राची मांडणी करणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचे विचार, त्यांचे अर्थशास्त्र जगाला माहिती व्हावे म्हणून ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गांधींजींनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कृतीशील अर्थशास्त्राची मांडणी करणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचे विचार, त्यांचे अर्थशास्त्र जगाला माहिती व्हावे म्हणून ‘गांधीकुमारप्पा’ वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. गुरूवारी त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त या पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. यावर कुमारप्पा यांचे साहित्य उपलब्ध केले असून यात सध्या दोन पुस्तके वाचायला मिळतील, अशी माहिती मगनसंग्रहालय समिती अध्यक्ष डॉ. विभा गुप्ता यांनी पत्रपरिषदेत दिली.
सध्या जगभर महात्मा गांधी व दे. सी. कुमारप्पा यांचे ग्रामीण भागाला महत्त्व देणारे अर्थशास्त्र पुन्हा अभ्यासले जात आहे. सध्या जग प्रगत झाले आहे; पण गरीबी, निरक्षरतेची खाई भीषण झाली आहे. प्रगतीने मानव चांगला होईल, ही अपेक्षा होती; पण उलट होत आहे. मानव आणखी हिंसक होत आहे. यामुळेच गांधीजींनी गावांकडे चला असे का म्हटले, त्यांचे अर्थशास्त्र काय होते हे युरोप व अमेरिका येथे स्कूल आॅफ इकॉनॉमीद्वारे अभ्यासले जात आहे. सध्या आपली वाटचाल रसायनांचा वापर, प्रदूषण याकडे होत आहे. यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका निर्माण झाला आहे. पृथ्वीची गती कमी होत आहे. चंद्र दूर जात आहे. सूर्य अधिक तळपत आहे. यामुळे जगाला सध्या गांधी व कुमारप्पांचे अर्थशास्त्र अभ्यासावे लागत आहे. गाव ते शहर हे सूत्र सर्वप्रथम अ.भा. ग्रामोद्योग संघ वर्धाने जगाला दिले होते. याबाबतचा प्रस्ताव प्लानिंग कमीशनपूढे मांडला होता; पण सध्या शहर ते गाव, असे अर्थकारण सुरू असून हे विनाशाकडे नेणारे आहे. ही बाब लक्षात घेत गांधी, कुमारप्पांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास होत आहे. नैसर्गिक शेती का, युद्ध का नको, मी शाकाहारी का व्हावे आदी प्रश्न जग विचारत आहे. या प्रश्नांच्या उत्तरांसाठी कुमारप्पा यांचे अर्थशास्त्र जगाला कळणे गरजेचे आहे. त्यांनी तीन प्रकारचे अर्थशास्त्र सांगितले होते. बंदर अर्थशास्त्रात तोडणे, विद्ध्वंस करणे; मधुमख्खी अर्थशास्त्र म्हणजे जेवढे घेतो तेवढे परत करणे व बकेट इकॉनॉमी म्हणजे जेवढे आहे तेवढे सर्व वापरणे होय. मधुमख्खी अर्थशास्त्र हेच जगाला तारू शकते, असे कुमारप्पा सांगत. जगाला खादी व गावांचे दर्शन घडवू शकेल असा भारत हा एकमेव देश आहे. यामुळे आपल्या देशाने बी इकॉनॉमी अवलंबिणे गरजेचे आहे. गांधीजींना मीठाच्या सत्याग्रहाची संकल्पना कुमारप्पा यांनी दिली होती. त्यावेळी मीठ तयार करणारे एक लाख लोक कारागृहात टाकण्यात आले होते, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
कुमारप्पा यांची ३० पुस्तके असून ग्रामोद्योग पत्रिका ते हिंदी व इंग्रजीतून चालवित असत. यंग इंडियामध्ये त्यांचे लेख प्रकाशित झालेत. या सर्व बाबी जगाला कळाव्या म्हणून कुमारप्पांचे वेबपोर्टल तयार केले आहे. यासाठी डॉ. गुप्ता, सचिव अजय कुमार, अॅड. अशोक अग्रवाल व आनंदकुमार यांनी श्रम घेतले, असे मनीषा पेंटे यांनी सांगितले. यावेळी मुकेश लुतडे उपस्थित होते.