राष्ट्रपतींना गांधी आश्रमाने घातली भूरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:44 PM2019-08-17T23:44:54+5:302019-08-17T23:45:43+5:30

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पुर्वनियोजीत दौऱ्यातील वेळापत्रकाला फाटा देत राष्ट्रपती तब्बल पाऊनतास परिवारासह बापू कुटीत थांबले. येथील आश्रम प्रतिष्ठांच्या सर्व उपक्रमाची राष्ट्रपतींनी पाहणी केली. शिवाय तेथील कामकाजाची माहितीही त्यांनी जाणून घेतली.

Gandhi's ashram laid to rest for President | राष्ट्रपतींना गांधी आश्रमाने घातली भूरळ

राष्ट्रपतींना गांधी आश्रमाने घातली भूरळ

Next
ठळक मुद्देपूर्वनियोजित दौऱ्यापेक्षा थांबले १५ मिनिट जादा। कार्यप्रणालीची जाणली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पुर्वनियोजीत दौऱ्यातील वेळापत्रकाला फाटा देत राष्ट्रपती तब्बल पाऊनतास परिवारासह बापू कुटीत थांबले. येथील आश्रम प्रतिष्ठांच्या सर्व उपक्रमाची राष्ट्रपतींनी पाहणी केली. शिवाय तेथील कामकाजाची माहितीही त्यांनी जाणून घेतली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हेलिकॉप्टर सकाळी १०.५५ वाजता सेवाग्राम येथील हमदापूर मार्गावर तयार करण्यात आलेल्या हेलीपॅडवर उतरले. यावेळी राज्यपाल डॉ. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रपतीच्या वाहनाचा ताफा सेवाग्राम आश्रमकडे रवाना झाला. आश्रमात त्यांचे आगमन होताच आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी राष्ट्रपतीसह त्यांच्या परिवारातील सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे स्वागत केले. आश्रमात केवळ नमस्कार करूनच त्यांचे स्वागत करण्यात आले. आश्रमच्या इतिहासात प्रथमच पारंपारिक पद्धतीला सुरक्षेचे कारण देवून स्वागताला फाटा देण्यात आला. (पाहूण्यांचे स्वागत आश्रम सुतमाला, शाल, चरखा देवून करीत असते.) त्यानंतर टी.आर.एन. प्रभू यांनी आदीनिवास, बा कूटी, बापूकूटी, महादेव कूटी आदींची माहिती राष्ट्रपतींना इंग्रजी भाषेतून दिली. आदी निवासाची पाहणी केल्यानंतर राष्ट्रपती व त्यांच्या पत्नी सविता यांनी आदी निवासमध्ये अंबर चरख्यावर सूत कताई केली. त्यानंतर राष्ट्रपती बापू कुटीतील सर्व धर्म प्रार्थनेत सहभागी झाले. त्यानंतर ते महादेवभाई देसाई कु टीतील ‘कपास ते कापड’ या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी गेले. येथील माहिती त्यांनी जाणून घेतली. राष्ट्रपतीच्या पत्नी सविता व कन्या स्वाती यांनी महादेव कुटीतील अंबर चरख्यावर सूत कताई करून बघितली व येथे काम करणाºया महिलांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर महादेवभाई देसाई भवनासमोर मोकळा जागेवर राष्ट्रपतींनी चंदनाचे झाड लावले. यावेळी आश्रमच्या जेष्ठ कार्यकर्त्या कुसूम पांडे यांचा परिचय अध्यक्ष प्रभू करून दिला. त्यानंतर राष्ट्रपतींनी आश्रम प्रतिष्ठानच्या कार्यालयात बसून तेथील व्हिजीट बुकावर आपला अभिप्राय लिहीला. त्यानंतर राष्ट्रपतीचा ताफा महात्मा गांधी इंन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या नव्या इमारतीकडे रवाना झाला. तेथे त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह उपस्थितांना संबोधित केले.

अर्धा तास विलंबाने पोहचले कार्यक्रमात राष्ट्रपती
महात्मा गांधी इंन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स येथे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुर्व नियोजित दौºयानुसार सकाळी ११.३० वाजता पोहोचणार होते. मात्र, बापूकूटीत राष्ट्रपती महोदयांना विलंब झाल्याने ते दुपारी १२ वाजता नव्याने बांधण्यात आलेल्या इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या सभागृहात पोहोचलेत. त्यामुळे अर्धा तास विलंबाने हा कार्यक्रम सुरू झाला. याठिकाणी राष्ट्रपतींनी १२.२३ वाजता भाषणाला सुरूवात केली. १२.३५ वाजता राष्ट्रपतींचे भाषण संपले. आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रपतींनी महात्मा गांधी यांच्या भूमित सुरू झालेल्या या संस्थेने देशासह विदेशातही नावलौकीक प्राप्त केला, असा गौरवपुर्ण उल्लेख केला. येथे राज्यपाल व मुख्यमंत्री यांचेही भाषण होईल अशी अपेक्षा उपस्थितांना होती. मात्र, दोघांचेही भाषण झाले नाही, हे विशेष.

पालकमंत्र्यांसह आमदारांना प्रेक्षकांत स्थान
महात्मा गांधी इंस्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या सुवर्ण महोत्सव वर्ष कार्यक्रमाच्या निमित्त्य आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी आदी उपस्थित होते. मात्र, या सर्वांना समोरील दुसºया रांगेत स्थान देण्यात आले होते. याच रांगेत संस्थेशी संबंधीत विविध विभागाचे प्रोफेसर, विभाग प्रमुख तसेच जिल्हाधिकारी विवेक भिमनवार हेही बसलेले होते.
मुख्यमंत्र्यांच्या कौटुंबिक संबंधाला दिला उजाळा
महात्मा गांधी इंस्टिट्यूट आॅफ मेडीकल सायन्सच्या सुवर्ण महोत्सव वर्ष कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरून आभार मानताना महात्मा गांधी इंस्टिट्यूटचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे यांनी मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांचे आजोबा डॉ. रानडे हे या संस्थेचे संस्थापक विश्वस्त होते, असा उल्लेख केला. या उल्लेखामुळे संस्थेशी फडणवीस परिवाराच्या नात्याला नव्याने उजाळा मिळाला.

पूरग्रस्तांना मदत करण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन
काही दिवसांपूर्वी देशासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटूंब बाधित झाले आहेत. या सर्वांप्रती संवेदना व्यक्त करून राष्ट्रपती म्हणाले की, त्यांचे आयुष्य लवकर पुर्वपदावर येईल, अशी मी प्रार्थना करतो. केंद्र आणि राज्य शासन पूरपीडितांच्या मदतीसाठी धावून आले असून समाजातील नागरिकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वयंप्रेरणेने पुढे यावे व आपले योगदान द्यावे. या संस्थेनेदेखील पूरग्रस्तांच्या आरोग्य सुविधेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

Web Title: Gandhi's ashram laid to rest for President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.