गांधींचे जीवन साधे; पण प्रभावित करणारेच आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:15 AM2018-10-17T00:15:23+5:302018-10-17T00:17:36+5:30
इथे यायला मला उशीर झाला; पण या ठिकाणी आल्यावर मला खुप आनंद झाला आहे. गांधीजींजे जीवन साधे असले तरी प्रभावित करणारेच आहे, असे गोव्याच्या राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी सांगितले. राज्यपाल सिन्हा यांनी मंगळवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन तेथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : इथे यायला मला उशीर झाला; पण या ठिकाणी आल्यावर मला खुप आनंद झाला आहे. गांधीजींजे जीवन साधे असले तरी प्रभावित करणारेच आहे, असे गोव्याच्या राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी सांगितले. राज्यपाल सिन्हा यांनी मंगळवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन तेथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी आश्रमातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने राज्यपाल मृदूला सिन्हा यांचे सूतमाळ व आश्रम माहिती पुस्तिका देऊन सिद्धेश्वर उंबरकर आणि शोभा कवाडकर यांनी स्वागत केले. त्यांना आश्रमच्या जेष्ठ कार्यकर्त्या कुसुम पांडे व मार्गदर्शिका अश्विनी बघेल यांनी आदी निवास, बा व बापू कुटी, बापू दप्तर, आखरी निवास, महादेव कुटी, विनाई विभाग आदी दाखवून त्याबाबतची माहिती दिली.
सर्व स्मारके अत्यंत साध्या पद्धतीचे असून बापूंचे जीवन साधे आणि कमीत कमी गरजामध्ये जीवन व्यतीत करणारे आहे. आज समाजातील जीवन पद्धत बदली आहे. गांधीजींनी अहिंसेच्या माध्यमातून देश स्वातंत्र्य करून दाखवले, असे राज्यपाल सिन्हा यांनी सांगितले. बापूकुटी मध्ये अभिवादन केल्यानंतर सर्वधर्म प्रार्थना झाली.
महादेवभाई कुटीतील चरखा व विणाई केंद्राला त्यांनी भेट दिली. जवळपास एक तास त्यांनी आश्रमात घालवून बापूंच्या कार्याची माहिती जाणून घेतली.
शिवाय त्यांनी आपला अभिप्रायही नोंदविला. त्यांनी आपल्या अभिप्रायात ‘मन आनंदीत झाले. वाचन आणि प्रत्यक्षात पाहण्यात मोठा फरक आहे. गांधीजींची १५० व्या जयंती प्रारंभी या ठिकाणी येण्याचा एक वेगळाच रोमांचक अनुभव येत आहे. या ठिकाणी राहणारे लोक बापूंच्या सानिध्याची अनुभूती घेत आहेत. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत आहेत. या भूमीत बापूंचा स्पर्श होऊन तो जीवनभर संग्रहित राहील’ असे त्यांनी नोंदविले आहे. याप्रसंगी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सदस्य अविनाश काकडे यांच्यासह आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.