दुचाकी चोरून विक्री करणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 10:38 PM2018-12-22T22:38:33+5:302018-12-22T22:41:03+5:30
सार्वजनिक ठिकाणांहून दुचाकी वाहने चोरून त्याची विक्री करणाऱ्या पाच सदस्यीय टाळीला समुद्रपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या आरोपींकडून पोलिसांनी चोरीच्या तब्बल २० दुचाकी जप्त केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : सार्वजनिक ठिकाणांहून दुचाकी वाहने चोरून त्याची विक्री करणाऱ्या पाच सदस्यीय टाळीला समुद्रपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या आरोपींकडून पोलिसांनीचोरीच्या तब्बल २० दुचाकी जप्त केल्या आहेत. या पाचही आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची २४ डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी पोलिसांनी मिळविली आहे.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, १५ डिसेंबरला जाम येथील हॉटेल अशोकाच्या वाहनतळावरून दुचाकी चोरून नेल्याची तक्रार समुद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याच तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान खात्रिदायक माहितीच्या आधारे सुरूवातीला हिंगणघाट येथील शुभम गोपाळ काटकर (२४) व पीयूष सुनील लोणारे (१८) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय चोरीच्या दुचाकी टाकळी येथील शालीक सातघरे, दिलीप ठाकरे व गणेश मोहिजे यांना विकल्याची माहिती पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ८ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या २० दुचाकी जप्त केल्या आहेत.
अटकेत असलेल्या पाचही आरोपीना समुद्रपूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात समुद्रपूरचे ठाणेदार प्रवीण मुंडे, अरविंद येनुरकर, रवी पुरोहित, आशीष गेडाम, वैभव चरडे आदींनी केली.