अर्धवट, पडक्या वास्तूंमधून निघतो गांजाचा धूर
By admin | Published: April 5, 2015 02:04 AM2015-04-05T02:04:32+5:302015-04-05T02:04:32+5:30
शहरात अवैध व्यवसायांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ राजरोसपणे दारू विकली जाते.
वर्धा : शहरात अवैध व्यवसायांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ राजरोसपणे दारू विकली जाते. सोबतच परजिल्ह्यांतून शहरात गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते़ यामुळेच शहरातील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींमधून रात्रीच्या सुमारास गांजाचा धूर निघत असल्याचे दिसून येते़ थातूरमातूर कारवाई केली जात असल्याने शौकिनांचे चांगलेच फावत असल्याचे दिसते़
जिल्ह्यात शहरापासून तर गावखेड्यापर्यंत खुलेआम दारूविक्री सुरू आहे. दारूसोबतच आता गांजाविक्रीचे प्रमाण वाढल्याने युवक व्यसनाच्या आहारी जात आहे. छुप्या मार्गाने गांजाची विक्री केली जाते़ गांजाचे व्यसन जडलेली व्यक्ती दररोज गांजा ओढल्याशिवाय राहू शकत नाही़ यामुळे गांजा मिळविण्यासाठी गैरमार्गाचा अवलंबही होतो. महाविद्यालयीन तरूणही या व्यसनाच्या आहारी गेल्याचे चित्र पाहावयास मिळते. सायंकाळ होताच निर्जनस्थळी अनेक जण गोळा होऊन मनसोक्त गांजा ओढतात. शहरातील अनेक शासकीय इमारतींचे बांधकाम अर्धवट झालेले आहे. या इमारतींमध्ये सध्या अवैध व्यवसायांना उधाण आल्याचे दिसून येते़ ठाकरे मार्केटमध्ये असलेल्या नाट्यसभागृहात सायंकाळच्या सुमारास मद्यपिंचा धुमाकूळ असतो. सोबतच शहरातील इतवारा चौक, पुलफैल, तारफैल, स्टेशनफैल, बोरगाव (मेघे), देवळी बायपास व शहरातील खिंडार इमारतींमधूनही गांजाचा धूर निघताना दिसतो.(शहर प्रतिनिधी)