कचरा जमा करणारी बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:39 AM2019-01-31T00:39:21+5:302019-01-31T00:40:27+5:30

कचऱ्यापासून उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या पारधी व इतर कचरा वेचक लोकांना हक्काचा रोजगार मिळवून देत, कचरा टाकाऊ नसून मौल्यवान आहे, अशी मानसिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कारंजा नगरपंचायतीच्या कल्पक मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी ..........

Garbage collecting bank | कचरा जमा करणारी बँक

कचरा जमा करणारी बँक

Next
ठळक मुद्देकारंजा नगरपंचायतीचा उपक्रम : कचऱ्याचे मूल्यांकन करून खात्यात जमा होणार पैसे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कचऱ्यापासून उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या पारधी व इतर कचरा वेचक लोकांना हक्काचा रोजगार मिळवून देत, कचरा टाकाऊ नसून मौल्यवान आहे, अशी मानसिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कारंजा नगरपंचायतीच्या कल्पक मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी २ आॅक्टोबरला स्वच्छ बँक आॅफ कारंजा या नावाने कचरा जमा करणारी बँक निर्माण केली आहे. सुरूवातीला अशक्य आणि नवखी वाटणारी ही कल्पना आता जोर धरू लागली आहे. दररोज अनेक गावकरी इंदिरानगर रोडवर असलेल्या या बँकेत आपला कचरा आणून, कचऱ्याचे मूल्य रक्कम आपल्या स्वच्छ बँक खात्यात जमा करून, उदरनिर्वाहाला हातभार लावत आहे.
या बँकेकरिता एका खासगी व्यक्तीने, नगरपंचायतच्या सहकार्याने सुरक्षित शेड बांधले आहे. येथे पैशाऐवजी सुका कचरा मोजमाप करून वेचकांच्या खात्यात डिपॉझिट केला जातो. त्या कचºयाचे मूल्यांकन करून कचरा आणणाऱ्याला पैसे दिले जातात. रिकाम्या दारूच्या बाटल्या थर्मोकॉल, लोह, लोखंड, पत्रे, तार फुटकी भांडी स्वीकारून वर्गीकरण केले जाते. बँकेच्या पासबुकप्रमाणे येथे कचरा मिळकत पासबुक देण्यात येते. तसेच एटीएम कार्डऐवजी आपल्याला ‘स्वच्छता कार्ड’ देण्यात येते. स्वच्छता कार्ड कारंजा क्षेत्रातील काही निवडक दुकानात वापरल्यास आपल्याला खरेदीवर सूट मिळते. या बँकेत बँक मॅनेजरचे काम पुनर्वापर योग्य कचरा खरेदी करणारा व्यक्ती तर बँक करस्पॉडंस्चे काम कचरावेचक करतात.
कचरा वेचकांना पुनर्वापर योग्य, सुका कचरा जमा करण्यासाठी नगरपंचायतीने छोटी कचरा गाडी, आणि वजन काटासुद्धा उपलब्ध करून दिला आहे. तसेच वेचकांना ओळख म्हणून नगरपंचायतीतर्फे जॅकेट, हातमोजे, मास्क, ओळखपत्रसुद्धा देण्यात आले आहे.
या बँकेचा फायदा म्हणून सध्या रस्त्यावर छोटे भंगार साहित्य दिसून येत नाही. वेचकांधमील न्यूनगंड कमी झाला आहे. त्याच्या कामाला सामाजिक प्रतिष्ठा मिळत आहे. न.पं.च्या कचरा प्रक्रिया केंद्रावर पुनर्वापर योग्य कचऱ्याचे प्रमाण काही अंशी कमी झाल्यामुळे कचरा प्रक्रियेवरील खर्चसुद्धा कमी होत आहे. नागरिकांनी हा प्रयोग पूर्णपणे स्वीकारल्यास, कारंजा शहर या नावीन्यपूर्ण कल्पनेचे जनक होऊ शकते. कचऱ्याप्रती मानसिकता बदलून शहर स्वच्छ निरोगी शहर बनू शकते. कचरा लाखमोलाचा ही संकल्पना नागरिकांच्या मनात रूजविण्याचा मुख्याधिकारी राऊत यांनी अध्यक्षासह सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने सुरू केलेल्या स्वच्छ बँक आॅफ कारंजा या प्रयोगाला साथ द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Garbage collecting bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.