कचरा डेपो उठलाय ग्रामस्थांच्या जीवावर
By admin | Published: May 27, 2015 01:55 AM2015-05-27T01:55:03+5:302015-05-27T01:55:03+5:30
नगर पालिकेच्या कचरा डेपोमुळे नजीकच्या नांदगाव (बोरगाव) येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
हिंगणघाट : नगर पालिकेच्या कचरा डेपोमुळे नजीकच्या नांदगाव (बोरगाव) येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. हिंगणघाट शहरातील कचरा ग्रामस्थांच्या जीवावरच उठला आहे. यामुळे हा कचरा डेपो स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी विविध संघटनांसह ग्रामस्थांनी केली; पण पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांद्वारे आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरालगतचा भाग म्हणून नांदगावची (बोरगाव) ओळख आहे. याच परिसरात पालिकेने कचरा डेपो थाटला असून शहरातील विविध ठिकाणाहून कचरा गोळा करून नांदगाव येथे साठविला जातो. पूर्वी या भागात फारशी वस्ती नव्हती; पण शहराचे आकारमान वाढले आणि तेथे नागरिकांची नवीन वस्ती झाली. या कचऱ्यामुळे तेथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कचरा व दुर्गंधीमुळे क्षयरोग, अस्थमा, काळीव आदी आजारांची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय तेथील दूषित पाणी थेट नदीत सोडले जाते. यामुळे शुद्धीकरण केंद्र नसल्याने गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे.
डेपोमधील कचरा सतत जाळला जात असल्याने गावातीत वातावरणही प्रदूषित होत आहे. परिणामी, जीवघेण्या आजारांत वाढ होत आहे. कचरा डेपो स्थापन करताना हिंगणघाट पालिकेने नांदगाव ग्रा.पं. शी काही करार केले होते. त्यातील अटी व शर्थींचे पालनही पालिका प्रशासन करीत नाही. यामुळे हिंगणघाट शहरातील कचरा ग्रामस्थांच्या जीवावर उठल्याचेच दिसते. नगर परिषद प्रशासनाने ग्रामस्थांच्या आरोग्याची दखल घेऊन नांदगाव येथील कचरा डेपो दुसरीकडे हटवावा, अशी मागणीही संघटनांसह ग्रामस्थांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)