साटोडा-आलोडीत कचराकोंडी; घंटागाडी झाली बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 06:02 PM2024-05-20T18:02:55+5:302024-05-20T18:03:21+5:30

नागरिकांमध्ये रोष: जागेअभावी निर्माण झाली समस्या

Garbage dump in Satoda-Alodi; The clock has stopped | साटोडा-आलोडीत कचराकोंडी; घंटागाडी झाली बंद

Garbage dump in Satoda-Alodi; The clock has stopped

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
शहरालगतच्या मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या साटोडा-आलोडी ग्रामपंचायत परिसरात गेल्या महिन्याभरापासून घंटागाडी बंद असल्याने कचरा संकलनाचे काम थांबले आहे. त्यामुळे आता नागरिकही मिळेल तिथे कचरा टाकत असल्याने आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.

लगतच्या ग्रामपंचायतीमध्ये कचरा संकलनाकरिता व विल्हेवाट लावण्याकरिता स्वतंत्र जागा नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत असून, या सर्व सोयी सुविधा पुरविताना ग्रामपंचायतींचीही अडचण होत आहे. पूर्वी साटोडा-आलोडी परिसरातील नागरिकांच्या घराघरातून कचऱ्याचे घंटागाडीद्वारे संकलन केले जायचे. प्रत्येक वॉर्डातील कचरा संकलन करण्याकरिता ग्रामपंचायतीकडे घंटागाड्या उपलब्ध आहे.

घंटागाड्यांद्वारे संकलित केलेला कचरा हा बायपासलगतच्या सिंदी (मेघे) व उमरी (मेघे) परिसरातील कंचरा डेपोत टाकला जात होता. परंतु या ठिकाणी इतरही ग्रामपंचायतीचा कचरा टाकायला सुरुवात झाली. तसेच कॅटर्सचालकही शिळे अन्न येथेच टाकायला लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरायला लागली. त्यामुळे सिंदी (मेघे) व उमरी (मेघे) परिसरातील सिंदी (मेघे) व उमरी (मेघे) ग्रामपंचायतींनी या परिसरात कचरा टाकण्यास मनाई केल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतः कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करणे भाग पडले. 

परिणामी साटोडा-आलोडी ग्रामपंचायतीसमोरही ही समस्या उभी ठाकल्याने कचरा संकलनाचे कामच ठप्प करण्यात आले. त्यामुळे आता गेल्या महिन्याभरापासून कचरा संकलन बंद असल्याने घरोघरी कचरा साचला आहे. नागरिकही आता मिळेल त्या जागेवर कचरा टाकायला लागल्याने परिसरात अस्वच्छता वाढायला लागली आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता परिसरातील नागरिक दुचाकीवरून कचरा पोत्यामध्ये नेत इतरत्र फेकत आहे. यातही संबंधित भागातील रहिवासी कचरा टाकण्यास विरोध दर्शवत असल्याने कचरा टाकावा तरी कोठे? असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने व्यवस्था करण्याची मागणी गजानन गुजरकर, सुधीर पोळ, पंकज शिवणकर, अनिकेत नेटके, बी. टी. घनोकार, श्याम शिवणकर, डॉ. संदीप काळे, निर्भय कुंवर, बळवंत पिंपळकर, मंगेश निकोडे यांच्यासह परिसरातील इतरही नागरिकांनी केली आहे


परिसरात समस्यांचा विळखा
ग्रामपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याचा कांगावा केला जात असला तरीही समस्यांचा विळखा कायम आहे. नाल्यांचे सदोष व अर्धवट बांधकाम केल्याने घाणीचे साम्राज्य कायम आहे. यातून डेंग्यू आजाराची साथ पसरण्याचीही शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. वॉर्डातील रस्त्यांवर रात्रीचा काळोख असतो तसेच अनेक भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अंजनामाता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पुलाचे सदोष बांधकाम करण्यात आले आहे. परिणामी, थोड्याच पावसात पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होते. अयोध्यानगर वॉर्ड क्रमांक दोनमध्ये नालीचे सदोष बांधकाम करण्यात आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा अनेक समस्या असून, त्याची सोडवून करावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बैठक झाली आहे. त्यांनी येत्या दोन-तीन दिवसांत नियोजन करून कचरा संकलनाचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन दिले आहे. लवकरच कचरा संकलन- विल्हेवाटीचा प्रश्न निकाली काढला जाईल. 
- बादल विरुटकर, सरपंच, साटोडा.


पाणीटंचाईची झळ
■ साटोडा-आलोडी परिसरात नळयो- जनेद्वारे तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा होतो त्या दिवशी नळावर सर्रास मोटरपंप लावले जात असल्याने अनेकांना थेंबभरही पाणी मिळत नसून कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.


एक महिन्यापासून घंटागाडी बंद असून, यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. याकडे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. सध्या डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असताना ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेऊन आहे.
- गौरव गावंडे, सदस्य

Web Title: Garbage dump in Satoda-Alodi; The clock has stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा