वेतनाकरिता टाकला रस्त्यावर कचरा
By admin | Published: June 2, 2017 02:04 AM2017-06-02T02:04:40+5:302017-06-02T02:04:40+5:30
नगर परिषदेंतर्गत सफाई कंत्राटदाराचे कामगारांनी एक महिन्याचा पगार अद्याप मिळाला नाही.
सफाई कामगारांचे आंदोलन : नालीतील घाण रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : नगर परिषदेंतर्गत सफाई कंत्राटदाराचे कामगारांनी एक महिन्याचा पगार अद्याप मिळाला नाही. या कारणामुळे संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी संत तुकडोजी वॉर्डातील राष्ट्रीय महामार्गावरील नंदोरी चौक व मॉ शेरावाली चौकातील रस्त्यावर घाण टाकून आपल्या समस्येकडे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. शेवटी नगर परिषद प्रशासनाने या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून मे महिन्याचे वेतन ६ जूनला देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी टाकलेला कचरा उचलून नेला.
शहरातील नवीन वस्तीच्या आठ वॉर्डाच्या साफसफाईचा कंत्राट स्थानिक कल्याण कंस्ट्रक्शनला तीन वर्षांपासून दिला आहे. या कंत्राटाची मुदत ३१ मार्चला संपली असून नवीन कंत्राट चंद्रपूरच्या एजन्सीला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दरम्यान एप्रिल व मे महिन्याचे सफाई काम जुन्या कंत्राटदाराला सोपविले होते. या कामांचे देयक संबंधीत कंत्राटदाराला दरमहिन्याचे २० तारखेला देण्यात येते; परंतु एप्रिल महिन्याचे देयक देण्यास १० दिवस विलंब झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या कंत्राटी कामगारांनी घाण कचरा रस्त्यावर टाकून आपली समस्या चव्हाट्यावर आणली; मात्र याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला.
या प्रकाराची माहिती मिळताच पालिकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, नगरसेवक सतीश धोबे, निलेश तुळसकर, निलेश पोगले, राजू कामडी, आशिष पर्बत, न.पा. मुख्याधिकारी अनिल जगताप, स्वास्थ निरीक्षक खोब्रागडे, चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेवून प्रकाराची पाहणी केली. यावेळी त्यांनी कंत्राटदार गजानन राऊत व सफाई कमगारांशी चर्चा करून ३० मे रोजी कंत्राटदाराला दिलेल्या धनोदशद्वारा एप्रिल महिन्याचे वेतन आज देण्याचे तसेच मे महिन्याचे वेतन ६ जूनला देण्याचे नगर पालिका प्रशासनाने आश्वासन दिले. त्यानंतर या कामगारांनी टाकलेला कचरा उचलून नेवून मार्ग पूर्ववत केला.
एप्रिल महिन्याच्या कामाचे देयक कंत्राटदाराला ३० मे रोजी धनादेशाद्वारे देण्यात आले. मे महिन्याचे देयक काढण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कामगारांचे आंदोलन चुकीचे आहे.
- अनिल जगताप, मुख्याधिकारी, न.पा. हिंगणघाट